भगवती रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण करणार- मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ९ : बोरिवली येथे महानगरपालिकेच्या भगवती रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. सुरुवातीला या जागेवर निवासी इमारती होत्या. या इमारतींचे पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर काम सुरू झाले. या रुग्णालय विस्तारीकरणाचे काम ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती, मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य मनीषा चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य असलम शेख, सुनील राणे यांनी भाग घेतला.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, रुग्णालय विस्तारीकरण कामाच्या दर्जाबाबत चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. विस्तारीकरण कामात एखाद्या मेडिकल स्टोअरला जागा देण्यात आली असल्यास त्याचीही पडताळणी करण्यात येईल. मालाड येथील रुग्णालय सुरू करण्याबाबत सूचना देण्यात येतील. तसेच मुंबई शहरातील, उपनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय, भगवती रुग्णालय व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयातील समस्या व प्रश्नाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
००००
नीलेश तायडे/विसंअ/
बीड शहरात नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत १९ कामांना मंजुरी – मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ९: बीड शहरात नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत पायाभूत सोयी सुविधांची कामे करण्यात येत आहेत. शहरात ५ कोटी ५ लाख ७१ हजार रुपयांची १९ कामे मंजूर करण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य बच्चू कडू यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मागील काळात आचारसंहिता असल्यामुळे बीड शहरातील कामांना कार्यादेश देता आले नव्हते. त्यामुळे कामे सुरू होण्यास उशीर झाला. बीड शहरातील कामे आराखड्याच्या निर्देशानुसार मंजूर करण्यात आली आहेत.
कुठे नियमानुसार, शासन निर्णयानुसार कामे झाली नसल्यास किंवा निकृष्ट दर्जाची झाली असल्यास, तेथील कामांची तक्रार द्यावी. तक्रारीवरून या कामांची चौकशी करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
०००
नीलेश तायडे/विसंअ/
अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर कारवाईसाठी लवकरच कायदा – मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ९: अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासन लवकरच कडक कायदा आणेल. यामध्ये विना नोंदणी लॅब सुरू असतील, तर त्यांना शिक्षेची तरतूद या कायद्यात असेल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. जिल्हास्तरावर बोगस डॉक्टर शोध मोहिमेप्रमाणेच बोगस लॅब शोध मोहीम हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सदस्य सुनील राणे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, राज्यात महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडून सन २०१९ पासून आतापर्यंत ७ हजार ८५ उमेदवारांनी प्रमाणपत्र घेतली आहेत. मुंबईमध्ये सध्या १९७ हॉस्पिटलशी संलग्न ठिकाणी लॅब आहेत. मात्र, लॅब सुरू करण्याची आवश्यक परवानगी नसताना ज्या ठिकाणी अनधिकृत लॅब सुरू असेल, त्या बंद करण्यात येतील. यासंदर्भात राज्य शासन लवकरच नवा कायदा आणत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या राज्यभरात भरारी पथक नेमून अशा बोगस लॅब शोधण्याची कार्यवाही केली जाईल. नगरविकास, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाशी निगडित विषय यामध्ये आहेत. त्यामुळे या विभागांची एकत्रित बैठक घेण्यात येईल. कायद्याचा मसुदा तयार आहे. याबाबत अधिकच्या सूचना घेऊन कडक कायदा आणण्यात येईल, अशी माहितीही मंत्री श्री. सामंत यांनी दिली.
यावेळी सदस्य अजय चौधरी, आशिष शेलार, राजेश टोपे, प्रकाश आबिटकर, योगेश सागर, नाना पटोले यांनी चर्चेत सहभाग घेतला.
०००
दीपक चव्हाण/विसंअ/
बेस्टच्या भंगार बस विक्री गैरव्यवहार प्रकरणाची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी – मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ९: मुंबईतील बेस्टच्या भंगार बस विक्रीप्रकरणी गैरव्यवहाराच्या आरोपांसंदर्भात उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती, मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य लहू कानडे यांनी यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. सामंत म्हणाले, बेस्टच्या भंगार बस आणि भंगार माल विक्रीबाबत ई-लिलाव पद्धत अवलंबली जाते. तरीही, याबाबतचे आक्षेप लक्षात घेत याप्रकरणी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येईल.
यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य ॲड. आशिष शेलार, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, नितेश राणे यांनी चर्चेत भाग घेतला.
०००
दीपक चव्हाण/विसंअ/