१० जुलै – राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस

भारताच्या एकूण जीडीपीच्या 1 टक्के व कृषी जीडीपीच्या 5 टक्के वाटा मत्स्योत्पादनामार्फत येतो, आणि हे सर्व शक्य झाले आहे केवळ एका व्यक्तीमुळे…ज्यांना भारतातील नीलक्रांतीचे जनक म्हणजेच फादर ऑफ  ब्लु रेवोल्युशन  डॉ. हिरालाल चौधरी.

भारताचा पूर्व उत्तरी हिस्सा हा त्याच्या विशिष्ट संस्कृती व समुदायामुळे प्रसिद्ध आहे. याच भागातील एक राज्य आसाम; खरंतर हे राज्य चहाच्या मळ्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. आसाममधील एका ठिकाण शिलाटी येथे सन 1921 मध्ये डॉ.हिरालाल चौधरी यांचा जन्म झाला. शिलाटी हे ठिकाण सध्या बांग्लादेशात श्रीहट्टा नावाने ओळखले जाते. श्रीहट्टामधील सुरमा घाटीला लागून असलेल्या कुबाजपुर या छोट्या गावात  गिरीशचंद्र चौधरी या सिविल इंजिनियरच्या घरात 21 नोव्हेंबर 1921 रोजी यांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिभाशाली विद्यार्थी असलेले हिरालाल चौधरी यांनी सन 1941 मध्ये आपले बीएससीचे शिक्षण पूर्ण केले. सन 1943 मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या अंतर्गत त्यांनी झुलॉजी या विषयात एमएससी पूर्ण केले. त्यानंतर सिलट येथील माणिकचंद महाविद्यालयात जैवविज्ञानिक विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. सन 1947 मध्ये भारत -पाक फाळणीच्यादरम्यान त्यांना नोकरी गमवावी लागली.

सध्याच्या बांग्लादेशात स्थित असलेले श्रीहट्टा हे तत्कालीन पूर्व पाकिस्तानात येत असे. सन 1948 मध्ये ते सेंट्रल इन्लॅंड फिशरीज रिसर्च इंस्टीट्युट, बरकपुर येथे कनिष्ठ संशोधन सहायक या पदावर रुजू झाले. एके दिवशी बरकपूर येथे रहात असताना गंगेच्या किनारी आढळणाऱ्या मासळीचे फुगलेले पोट दिसून आले, ते पोट दाबताच त्यातुन पारदर्शी अंडे बाहेर आले. निरीक्षणाकरिता त्यांनी ही अंडी एका भांड्यात जमा केली. निरीक्षणादरम्यान डॉ.चौधरी यांना कार्प माशांच्या प्रेरित प्रजननाची संकल्पना सुचली.

कार्प प्रजाती आशिया व युरोप खंडातील मूळ निवासी मत्स्य प्रजाती मानली जाते. तलावातील बंदिस्त प्रणाली कार्प प्रजातीच्या प्रजननासाठी प्रतिकुल असल्याने अशा वातावरणाचा परिणाम माशाच्या पियुषिका ग्रंथी व जननग्रंथीवर होत असे. या दोन्ही ग्रंथीच्या अपु-या स्त्रावामुळे माशाचे बंदिस्त प्रणालीत प्रजनन होत नसे. त्याकाळात कार्प प्रजातीच्या संवर्धनाकरिता संपूर्णपणे नैसर्गिक बीजावर अवलंबून रहावे लागत असे.

मत्स्यबीज उत्पादनाची समस्या सोडविण्याकरीता प्रेरीत प्रजननाच्या तंत्रज्ञानाचा शोध लागला. या शोधामुळे भारतात आज रोजी मोठ्याप्रमाणात भुजलाशयीन मत्स्योत्पादन घेतले जाते. भूजलाशयीन मत्स्यप्रजातीमध्ये कार्प मासळीला जागतिक बाजारपेठेत अनन्य साधारण महत्त्व आहे.

सर्वप्रथम हा प्रयोग ‘स्मॉल मड गोबी प्रजातीच्या माशांवर करण्यात डॉ. चौधरी यांना यश मिळाले. त्याच वेळी सन 1950 मध्ये त्यांची वरिष्ठ संशोधन सहायक या पदावर ‘सेंट्रल इंनलॅंड फिशरीज रिसर्च इंस्टिट्युटच्या पॉंड कल्चर सेक्शन मध्ये पदोन्नतीने नियुक्ती झाली. जेथे ते डॉ. अलीकुन्ही यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. डॉ.अलीकुन्ही यांनी डॉ.चौधरी यांना त्यांच्या प्रयोगाचे कार्य करण्याकरिता नेहमी प्रेरणा दिली. त्याचबरोबर अमेरिकेतील अबुरान विद्यापीठातील मत्स्य प्रेरित प्रजनन या विषयात पारंगत असलेल्या जगभरात प्रख्यात डॉ.स्विंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्यांना अमेरिकेत पाठवले. सन 1955 मध्ये Ptutory Gland Extract (पियुषिका ग्रंथीच्या अर्क) चा मत्स्य प्रजननावर होणारा परिणाम या विषयाच्या शोधनिबंध लिहिला.   या निबंधाच्या सहाय्याने अमेरिकेतील अबुरान विद्यापीठामधून ‘मत्स्यपालन व्यवस्थापन’ या विषयातून मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली व त्यानंतर ते भारतात परतले.

भारतात परतल्यानंतर सन 1955-56 मध्ये त्यांनी देशातील काही मुळनिवासी प्रजातींच्या माशांचे प्रेरीत प्रजनन यशस्वीरित्या  पूर्ण केले.  पुढे डॉक्टर आलीकुन्ही यांनी सेंट्रल इंनलॅंड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट येथे प्रेरित प्रजानाद्वारे मत्स्यबीज निर्मिती या विषयावर ओरिसा या ठिकाणी एक मोठा प्रकल्प राबवला व 10 जुलै 1957 रोजी या दोन शास्त्रज्ञांना प्रेरीत मत्स्यप्रजजननाच्या प्रयोगात यश मिळाले. व त्यानंतर भारतातील मत्स्य शेतीचा चेहरा मोहरा बदलला. डॉ.हिरालाल चौधरी यांना मिळालेले हे यश भारतातील नीलक्रांतीची सुरुवात ठरली.

प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या प्रेरीत प्रजननातून तयार झालेल्या मत्स्यजिऱ्यांना यशस्वीरित्या अर्ध बोटुकली व त्यानंतर बोटुकली आकारापर्यंत विकसित करण्यात आले. सन 1958 मध्ये डॉ.हिरालाल चौधरी यांनी जगात सर्वप्रथम लेबिओ, सि-हीनस व कटलासारख्या मत्स्य प्रजातींचे यशस्वीरित्या प्रजनन करून मोठ्या प्रमाणात मत्स्य बीज निर्मिती करण्याची संकल्पना जगापुढे मांडली. एवढेच नव्हे तर हे तंत्र मत्स्य शेतकऱ्यांपर्यंत तातडीने पोहचवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात तेथील स्थानिक मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिका-यांना या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. व त्यांचा मदतीने अत्यंत अल्प कालावधीत हे तंत्रज्ञान सर्वसामान्य मत्स्य शेतकऱ्यांपर्यंत पोहविण्याचे कार्य केले.

डॉ.चौधरी यांच्या यशस्वी प्रयोगामुळे भारतातील भूजलाशयिन मत्स्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. डॉ.हिरालाल चौधरी यांची पुढे पदोन्नती मत्स्य व्यवसाय विस्तार अधिकारी या पदावर 1959 मध्ये झाली. त्यांना कलकत्ता युनिव्हर्सिटीने 1961 मध्ये आचार्य पदवी प्रदान केली. या पदवी अभ्यासक्रमात त्यांनी ‘पियुषिका ग्रंथी अर्काचा मासळीच्या प्रजननावर होणारा परिणाम’ हा शोध निबंध लिहिला.त्यानंतर सन 1971 ते 1975 मध्ये त्यांनी भुवनेश्वरमध्ये स्थित सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर येथे कार्य केले.

1975 मध्ये पॅसिफिक सायन्स काँग्रेस दरम्यान जपानचे प्रख्यात डॉ. कुरोनुमा यांनी त्यांना ‘फादर ऑफ इंड्युस्ड ब्रीडिंग’ हा किताब बहाल केला. त्याचबरोबर डॉक्टर चौधरी यांना गॅमा-सिग्मा-डेल्टा पुरस्कार, चंद्रकला होरा मेमोरियल गोल्ड मेडल, रफी अहमद किदवाई, गोल्डन की, वर्ल्ड ॲक्वाकल्चर वार्ड इत्यादी अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले.

सन 1976 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतल्यावर डॉ.चौधरी यांनी फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन (FAO), साउथ ईस्ट एशियन फिस्टीज डेव्ह डेव्हलपमेंट सेंटर (SEAFDEC) सारख्या अनेक महत्त्वपूर्ण संस्थान बरोबर काम केले. डॉ.हिरालाल चौधरी यांना मिळालेले यश भारतातील नीलक्रांतीची सुरुवातीस कारणीभूत ठरले. सन 2001 मध्ये डॉ.हिरालाल चौधरी यांच्या कार्यास सन्मानित करण्यासाठी भारत सरकारद्वारे 10 जुलै हा दिवस “राष्ट्रीय मत्स्य-शेतकरी दिवस” म्हणून घोषित करण्यात आला. अशा महान व्यक्तीचे कार्य मत्स्य व्यवसायाशी निगडित प्रत्येक व्यक्तीच्या चिरस्मरणी रहावे, म्हणून आजचा दिवस साजरा करण्यात येतो.

00000

अमिता रा.जैन

सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी,

अमरावती.