राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश – मंत्री छगन भुजबळ
मुंबई, दि. १० : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले जातील, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
विधानसभेत आज सदस्य संजय सावकारे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य राम सातपुते, दीपक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, राज्यातील १ लाख २६२ अधिकारी आणि कर्मचारी यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेतला असल्याचे निष्पन्न झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील ३ हजार १२३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या शिधापत्रिका योग्य योजनेत वर्ग करण्याच्या सूचनाही सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
०००
शैलजा पाटील/विसंअ/
भेसळयुक्त अन्न नमुन्यांच्या तपासणीसाठी ‘पीपीपी’ पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम
मुंबई, दि. १० : भेसळयुक्त अन्न नमुने तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मात्र, प्रयोगशाळांची अन्न नमुने तपासण्याची मर्यादीत क्षमता असल्याने मोठ्या प्रमाणावर अन्न नमुने तपासणीसाठी प्रतीक्षेत असतात. अशा परिस्थितीत ‘पीपीपी’ (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
सदस्य मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य अनिल देशमुख, बच्चू कडू, यशोमती ठाकूर, योगेश सागर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री श्री. आत्राम म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात अंमली पदार्थ व अल्पार्झोलाम (कुत्ता गोळी) यांची बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मार्च ते मे 2024 दरम्यान 6 गुन्हे दाखल करून 13 आरोपींना अटक केली आहे. मालेगाव शहर परिसरात टिक्का फ्राय मसाला, मिरची पावडर, सिंथेटिक पावडर यासह एक लाख 90 हजार रुपये किमतीचे एकूण 610.5 किलोग्रॅम साहित्य जप्त करण्यात आले आहे.
भेसळयुक्त दुधाबाबत एका वर्षात 196 दुधाचे नमुने तपासण्यात आले आहेत. यामध्ये 25 हजार 338 लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला असून 13 लाख 44 हजार 406 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुधाची भेसळ रोखण्यासाठी 20 अधिकाऱ्यांचे विशेष पथकही तयार करण्यात आले आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्याचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना दरमहा उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे निश्चितच भेसळयुक्त पदार्थांवरील कारवाया वाढल्या आहेत, असेही मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितले.
०००
नीलेश तायडे/विसंअ/
महामार्ग प्रकल्प अहवालात पाणी निचऱ्याच्या उपाययोजनांचा समावेश करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई, दि. 10 : महामार्ग निर्मितीचे काम करताना पाण्याचा निचरा होणे महत्वाचे असते. त्यामुळे रस्ते काम करतानाच पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजनांचा रस्त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविताना समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य डॉ. राहूल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.यावेळी सदस्य नाना पटोले, प्रशांत बंब, सुरेश वरपुडकर, संजय सावकारे, अमित देशमुख, उदयसिंह राजपूत, संदीप क्षीरसागर यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री श्री.चव्हाण म्हणाले, परभणी – गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावरील पी क्यू सी पॅनल्स मध्ये भेगा पडल्याचे निदर्शनास आले. या महामार्गावर पडलेल्या भेगांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या मार्फत नेमलेल्या तांत्रिक सल्लागारांकडून त्रयस्थ पद्धतीने अंकेक्षण करण्यात आले. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पाण्याचा निचरा न झाल्यामुळे ओवर फ्लडींग होऊन रस्त्याच्या सबग्रेड मध्ये पाण्याचा अंश वाढल्यामुळे काही ठिकाणी काँक्रीट पी क्यू सी पॅनेल्स मध्ये भेगा पडल्याचे निदर्शनास आले. या पॅनेल्सची दुरुस्ती कंत्राटदाराने आय.आर.सी. मानकानुसार स्व-खर्चाने पूर्ण केलेली आहे. तसेच पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस कच्ची गटारे व गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूस काँक्रीट ड्रेन बांधण्यात आली आहेत. कंत्राटदाराने केलेल्या पी क्यू सी पॅनेल्स दुरुस्तीकामाची आय. आय. टी., रुरकी व सेवानिवृत्त मुख्य अभियंता यांच्या टीममार्फत तपासणी करण्यात आली असून त्यांच्या अहवालानुसार दुरुस्तीचे काम आय. आर. सी. मानकानुसार योग्यप्रकारे झाले आहे. सद्यःस्थितीत सदर रस्ता वाहतुकीस सुस्थितीत आहे.
जिंतूर- परभणी व पाथरी- परभणी या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित कामाबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांची बैठक घेवून उर्वरित कामाची सुरुवात करण्यात येईल, असे मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.
००००
शैलजा पाटील/विसंअ/