अतिवृष्टीमुळे अनुपस्थित उमेदवारांकरिता १३ जुलैला मराठी, इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ८ जुलै २०२४ रोजी आयोजित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अतिवृष्टीमुळे अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांकरिता मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी आता १३ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

८ जुलै, २०२४ रोजी मुंबई परिसरात अतिवृष्टी झाल्याने वाहतुकीच्या साधनांवर परिणाम झाला होता. परिणामी या दिवशी चाचणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहता यावे, याकरिता चारही सत्रांची कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा ४५ मिनिटे उशिराने सुरु करण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता. तरीही अतिवृष्टीमुळे अनेक उमेदवारांना चाचणीसाठी उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे ८ जुलै, २०२४ रोजी मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना संधी देण्याच्या दृष्टीने टंकलेखन कौशल्य चाचणी पुन्हा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

या मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचण्या १३ जुलै, २०२४ रोजी तिसऱ्या व चौथ्या सत्रात आयोजित करण्यात येणार आहेत. टंकलेखन कौशल्य चाचणीच्या ठिकाणाचा तपशील व उमेदवारांना विहीत करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील प्रवेशप्रमाणपत्राद्वारे अवगत करण्यात येणार असून, सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ/