मुंबई, दि. ११ : भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना जन्म दाखला, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापुरवठा पत्रिका, जातीचे दाखले देण्याबाबत सर्व जिल्ह्यात 30 ऑगस्टपर्यंत मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश महसूल, पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
विधानभवन येथे भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात बैठक झाली. याप्रसंगी गृहनिर्माण तथा इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, माहिती व तंत्रज्ञान, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय पुरी भटके विमुक्त विकास परिषदेचे पदाधिकारी हजर होते. सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
मंत्री अतुल सावे म्हणाले की, भटक्या विमुक्त जातीतील नागरिक एका जागी दीर्घकाळ राहत नसून वारंवार स्थलांतरित होत असल्याने शिक्षणासह विविध शासकीय लाभापासून वंचित राहतात. त्यांना शासकीय दाखले व प्रमाणपत्र मिळण्यासाठी विविध शासन निर्णय निर्गमित केले आहेत. या समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी प्रामुख्याने जन्म दाखला, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, आयुष्यमान भारत आरोग्य पत्रिका, जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र यांची गरज असते ते मिळताना विविध समस्या टाळण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. विभागीय आयुक्तांनी या मोहिमेबाबत दर आठवड्यात आढावा घ्यावा. संबंधित जिल्हाधिकारी यांनी मोहिमेसाठी समन्वय साधत शिबिरांच्या माध्यमातून जास्तीत जास्त दाखले देण्यासाठी कार्यवाही करावी.
याप्रसंगी भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरीकांना शासकीय दाखले व प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रामुख्याने जन्म दाखला अथवा जन्माचे नोंद उपलब्ध नसते. आधार ओळखपत्र मिळणेबाबत कागदपत्री पुराव्याच्या अडचणीची माहिती देण्यात आली. यासह विविध अडचणींवर उपाययोजना व पर्यायाबाबत चर्चा करण्यात आली.
भटके विमुक्त समाजातील नागरिकांना मतदार ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा अधिकृत केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्याचा भटके विमुक्त समाजाचा असल्याचा दाखला, शहरी भागात नगरसेवकांचा व ग्रामीण भागात सरपंच/उपसरपंच यांचा रहिवाशी दाखला यापैकी कोणतेही एक कादगपत्र असल्यास आवश्यक असलेले दाखले मिळणार आहेत.
भटक्या विमुक्त जाती विकास परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी समाजाच्या अडचणी व परिस्थितीबाबत माहिती दिली.
०००
किरण वाघ/विसंअ/