‘निर्धार ग्रामीण विकासाचा’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

0
17

मुंबई, दि. १२: गावातील प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान उंचवावे या उद्देशाने ग्रामविकास विभाग काम करीत आहे. ग्रामीण आवास योजना ते महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येणारे ‘उमेद’ अभियान यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामविकास विभाग ग्रामविकास मंत्री यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबवित आहे. ग्रामीण जनतेच्या जीवनमानाशी संबंधित असलेल्या विविध योजना ग्रामविकास विभाग राबवितो. या योजनांची ‘निर्धार ग्रामीण विकासाचा’ ही माहिती पुस्तिका सर्वांना उपयुक्त आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन येथे  पुस्तक प्रकाशनावेळी सांगितले.

पुस्तक प्रकाशनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, केंद्र सरकार व राज्य शासनाच्या आवास योजना, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ अभियान हा कार्यक्रम राज्याच्या ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब महिलांचे दारिद्य्र निर्मूलन होऊन ते सर्व आत्मनिर्भर व्हावेत, यासाठी राबवला जात आहे. या कार्यक्रमामुळे ग्रामीण महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी चालना मिळत आहे. राज्यात मागील एक वर्षाच्या कालावधीत १३ लाखांपेक्षा जास्त महिला ‘लखपती दिदी’ झाल्या आहेत. गावातील दळणवळण यंत्रणा चांगली असावी, यासाठी देखील उकृष्टपणे काम होत आहे. तसेच ग्रामविकास विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. या सर्व योजनांची माहिती ‘निर्धार ग्रामीण विकासाचा’ पुस्तिकेत आहे ही माहिती सर्वापर्यंत पोहचवा, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

गावांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन तत्पर : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्याच्या विकासात ग्रामविकास विभागाचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. ग्रामीण गृहनिर्माण महाआवास अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यासह सर्व योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. प्रत्येक गाव समृद्ध व्हावे, यासाठी गावातील रस्ते दर्जेदार करून हजारो गावे मुख्य रस्त्यांना जोडली जात आहेत. बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले आहेत. ग्रामस्थांचे जगणे सुसह्य होण्यासाठी सर्व योजना गतीने राबविण्यावर शासनाचा भर आहे. ‘आषाढी वारीम’मध्ये वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ग्रामविकास विभाग सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतही भरीव निधी उपलब्ध करून दिला जात आहे. गेल्या दोन वर्षात या शासनाने ग्रामविकासासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती या पुस्तिकेत आहे, असेही मंत्री श्री. महाजन यावेळी म्हणाले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here