धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजने’साठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १२ : इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना’ राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मुंबई उपनगरचे सहाय्यक संचालक यांनी केले आहे.

वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यात येते.

उच्च शिक्षण घेणाऱ्या द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना दि. 25 जुलै 2024 पर्यत अर्ज करता येणार असून निवड यादी दि. 5 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर होईल. तर उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना दि. 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार असून दि. 2 सप्टेंबर 2024 रोजी निवड यादी जाहीर होईल.

या योजनेकरिता निश्चित करण्यात आलेल्या अटी शर्ती पुढील प्रमाणे आहेत.

शासकीय वसतिगृहामधून प्रवेश अर्जाची पी.डी.एफ. आवश्यक त्या प्रती सह सहाय्यक संचालक कार्यालयात सादर करावी. विद्यार्थ्यांनी अर्जासोबत बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक संलग्न करुन गृहपालाकडे सादर करावा. विद्यार्थी १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. किमान त्यांना ६० टक्के गुण असणे आवश्यक. विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी आहे. अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत.

भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी),स्वयंघोषणापत्र (दिलेली महिती खरी व अचूक असल्याबाबत), कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, भाड्याने राहत असल्याबाबतची भाडे चिट्ठी व भाडे करारपत्र/करारनामा, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. अधिक माहितीसाठी  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, भाग-१, चौथा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई ४०००७१ या पत्त्यावर संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/