विकसित भारताची संकल्पना हे एक लक्ष्य नसून ते पवित्र अभियान – उपराष्ट्रपती  जगदीप धनखड

मुंबई, दि. १२ : विकसित भारत @2047 हे केवळ एक लक्ष्य नसून ते एक पवित्र अभियान आहे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सांगितले. हे दशक भारताचे दशक आहे असे ठाम प्रतिपादन करत “प्रत्येक नागरिक, प्रत्येक संस्था आणि आपल्या समाजातील प्रत्येक घटकाने” या अभियानात अधिकाधिक योगदान द्यावे, असे आवाहन उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी केले.

उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी आज मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी – विद्यार्थिनी, प्राध्यापकांना संबोधित केले. याप्रसंगी राज्याचे राज्यपाल रमेश बैस, उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड , राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल, एन एम आय एम एस अभिमत विद्यापीठाचे कुलपती अमरीश पटेल, कुलगुरू रमेश भट उपस्थित होते.

उपराष्ट्रपती श्री.धनखड यांनी ‘भारताचे सक्षमीकरण : विकसित भारत 2047 घडवण्यात उच्च शिक्षण संस्थांची भूमिका’ याविषयी विचार व्यक्त केले.

ते म्हणाले,  2047 मधील विकसित भारतासाठी आपल्या सर्वांचे योगदान बहुमूल्य आहे. मी यास 1947 नंतरचे हे दुसरे मिशन म्हणून पाहतो आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षण व्यक्तीच्या जीवनात चमत्कार घडवते आहे. शिक्षण नवोन्मेषाला चालना देते, आर्थिक वाढीला प्रोत्साहन देते आणि स्वप्ने तसेच महत्वाकांक्षासाठी मार्ग बनवते. शिक्षण हे व्यक्ती, समाज, आणि देशाच्या विकासात मोठे काम करते. व्यक्ती आणि समाजाला सक्षम बनवण्याची शक्ती शिक्षणातून निर्माण होते.उच्च शिक्षण हे राष्ट्राच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचे युवक व विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक असून भविष्यातील देशाचे आधारस्तंभ आहेत.

ते म्हणाले, 2047 मधील विकसित भारताला घडविण्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान बहुमूल्य ठरणार आहे. विद्यार्थी व युवकांनी कोषामधून बाहेर पडून भविष्यातील या संधीचा वेध घ्यावा, आजची युवा पिढी चांगल्या पद्धतीने विकसित झाली पाहिजेत. आपण अजूनही स्पर्धा परीक्षांच्या गराड्यात आहोत. फार प्राचीन काळापासून नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला अशा सर्वोत्कृष्ट, नामांकित विद्यापीठांचा, प्राचीन शिक्षण पद्धतीचा परंपरेचा वारसा भारताला लाभला आहे. या संस्थांनी भारताला एक शक्ती स्थानी बसवले आहे. जागतिक पटलावर भारत मुत्सद्देगिरीतील मोठी सुप्त शक्ती आहे, या प्रेरणादायी इतिहासाचा उच्चार त्यांनी केला.

उपराष्ट्रपती श्री.धनखड मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, मनात जिद्द आणि चिकाटी असली की विदयार्थी कुठेही पोहचवू शकतो. युवकांनी बाहेर पडून भविष्यातील या संधीचा वेध घेतला पाहिजे.  पण काही नकारात्मक बाबींचा धोका देखील आहे त्या ओळखून त्यावर मात करता आली पाहिजे. जीवनामध्ये चांगला मार्ग निवडणे गरजेचे आहे यशासाठी कधीही शॉर्टकट वापरू नका. कायद्याचा आदर करणे म्हणजे राष्ट्रवादाचा आदर,  लोकशाहीचा आदर, आणि गुणीजनांच्या गुणवत्तेचा आदर करणे होय. म्हणूनच, कायद्याच्या योग्यतेवर आपला विश्वास असला पाहिजे. न्यायापुढे सर्व समान असतात, असेही त्यांनी सांगितले.

युवा पिढीसाठी असलेल्या अमर्याद संधींबाबत बोलताना उपराष्ट्रपती श्री.धनखड यांनी नवीन शिक्षण धोरण हे फक्त पदवी देणारे नसून माणूस घडवणारे ठरेल असे सांगितले. त्यांनी 1947 नंतर आतापर्यंत देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. सरदार वल्लभभाई पटेल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघटित एकसंघ भारताच्या उभारणीतील योगदानाचा उल्लेख केला. आजची जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांसाठी आकर्षण असणारी तिसरी सर्वात मोठी भारतीय अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने वाढत आहे. युरोपीय युनियन मधील देशांसाठी महत्त्वाचे ठरली आहे.  जी20,  भारत मंडपम, वर्ल्ड पार्लमेंट या घटना त्याच्या निदर्शक आहेत.  चांद्रयान मोहिमेचे यश, स्टार्ट अप इंडिया, ग्रीन हायड्रोजन मिशन, हर घर जल, सोलर पॉवर होम, डिजिटालायझेशन, डी बी टी, भारताचे निर्यातीतील बलस्थान अशा विकासाच्या अनेक पाऊलखुणांबद्दल त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे काम महत्त्वाचे आहे. अत्याधुनिक उद्योगांनी या उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये संशोधन व विकासासाठी प्रयोगशाळा म्हणून पहावे असे आवाहन त्यांनी केले. या वेगात बदलणाऱ्या विकसित भारताच्यामध्ये योगदानासाठी युवा विद्यार्थ्यांनी पुढे यावे असे सांगून नवी दिल्ली येथील नवीन संसद भवन येथे भेट देण्यासाठी त्यांनी या युवा विद्यार्थ्यांना आमंत्रण दिले.

कार्यक्रमात सुरुवातीस विद्यापीठाचे कुलपती श्री. पटेल यांनी उपराष्ट्रपती श्री. धनखड व सर्व मान्यवरांचे स्वागत केले. खासदार श्री. पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. कुलगुरू श्री. भट यांनी प्रास्ताविक केले.

०००

किरण वाघ/विसंअ