शिकाऊ उमेदवारीच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी -पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दि. १५ (जिमाका) : ‘शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्य’ हे या वर्षीच्या जागतिक युवा दिनाचे घोषवाक्य असून, शिकाऊ उमेदवारीच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. त्यांनी कायमस्वरूपी रोजगार प्राप्तीसाठी समर्पित भावनेतून काम करुन संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शिकाऊ उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. रावसाहेब थोरात सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक आर. एस. मुंडासे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी इंद्रभान काकड आदि मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत कार्यरत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), नाशिक व उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक या संस्थांतर्गत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिकाऊ उमेदवारी नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. यासाठी जिल्ह्यातून दोन हजारपेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींची निवड प्रक्रिया झाली असून, त्यातील ७०० प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यातील काही उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र नियुक्तीपत्र देण्यात आले.

जागतिक युवा दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले की, शिकाऊ उमेदवारीच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण आणि आदिवासीबहुल क्षेत्रातील प्रशिक्षणार्थींना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या अनुभवासह रोजगार मिळून चरितार्थ चालविण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळालेले प्रशिक्षण, घेतलेले कष्ट व कौशल्य पणाला लावून काम करावे. या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योगांनाही कुशल कामगार पुरवठा होईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिकाऊ उमेदवारीतून उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिल्याबद्दल औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्रशिक्षक वर्ग व रोजगार देणाऱ्या कंपन्यांचे आभार व्यक्त केले. तसेच, उपस्थित युवकांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूरला निधी देण्यात आला होता, यातून संस्थेच्या विकासासाठी मदत झाल्याचे सांगून पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्य शासनाने शेतकरी, माता भगिनीबरोबरच युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शिकाऊ उमेदवारीदरम्यान मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून दर वर्षी १० लाख तरूण तरूणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा १० हजार रूपयांपर्यंत मानधन देण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

आर. एस. मुंडासे म्हणाले, कौशल्य विकास हे गाभा क्षेत्र असून देश आणि राज्य पातळीवर त्याला मोठे महत्त्व आहे. राज्यात दरवर्षी साधारणपणे ८० हजार ते एक लाख शिकाऊ तरूणांची भरती केली जाते. अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे हे साधन आहे. शिकाऊ उमेदवारीनंतर कुशल कामगार निर्मिती होते. आधुनिक तंत्रज्ञान, आत्मविश्वास आणि कौशल्य वृद्धींगत होते. त्यामुळे कुशल कामगार पुरवठा होऊन प्रगतशील भारतात महाराष्ट्र अग्रस्थानी राहण्यास सहाय्य होत आहे. स्किल इंडिया आणि मेक इन इंडिया या योजनांसाठी हातभार लागत आहे, असे ते म्हणाले.

यावेळी वर्ल्ड स्किल काँपिटिशनमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा सत्कारही मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते करण्यात आला.

प्राचार्य दीपक बाविस्कर, प्राचार्य एम. एस. चकोर, उपप्राचार्य मोहन तेलंगी, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार जे. जे. पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. राज्यगीत गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. इंद्रभान काकड यांनी प्रास्ताविक तर नरेंद्र नेरकर यांनी सूत्रसंचालन केले.

०००