मुंबई, दि. 16 :- शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनींचा पोत सुधारून त्या लागवडीयोग्य बनविणे गरजेचे आहे. क्षारपड जमिनींच्या सुधारणेसाठी निचरा तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याने यासाठीचा आवश्यक प्रस्ताव तयार करून तो शासन मान्यतेसाठी तातडीने पाठवावा. या आराखड्यास प्रशासकीय मान्यतेसह आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
शिरोळ (जि. कोल्हापूर) तालुक्यातील क्षारपड व पाणथळ क्षेत्र सुधारण्यासाठी प्रस्तावित योजनेच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, लाभक्षेत्र विकास सचिव डॉ. संजय बेलसरे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणेच्या अधीक्षक अभियंता तथा संचालक वैशाली नारकर आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, क्षारपड जमीन सुधारणा काम लोकोपयोगी व शेतकरी हिताचे आहे. या कामातून नापिक जमीन लागवडीखाली येणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा निश्चित लाभ होणार आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणेचा प्रस्ताव सादर करताना तो परिपूर्ण सादर करावा. यामध्ये सबंधित शेतकरी हिस्सा १० टक्के, सबंधित सहकारी साखर कारखाना १० टक्के हिस्सा याबाबतची संमतीपत्र यांचा समावेश असावा.
या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पर्जन्यमान, नद्यांची पाणी पातळी, धरणांमधील पाणी साठा याबाबतचा आढावा कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतला.
0000