मुंबई, दि. १६ : राज्यात मतदार याद्यांचा १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकाच्या आधारावर “विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (दुसरा)” राबविण्यात येत आहे. या कालावधीत मतदारांनी नोंदणी केलेले नाव, पत्ता, वय व इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच त्यात दुरुस्तीची आवश्यकता असल्यास या कालावधीत संबंधित तपशील दुरुस्त करुन घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार “विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (दुसरा)” राज्यात २५ जुलै ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदार यादी तयार करणे, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदारयादीत सुधारणा करणे तसेच, तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्ययावत करणे, नमुना १-८ तयार करणे, अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करणे आदी कामे प्रामुख्याने करण्यात येत आहेत. मतदानाच्या दिवशी आपले मतदार यादीत नाव नाही, असे होऊ नये, यासाठी पात्र नागरिकांनी या कालावधीमध्ये त्यांची नावे मतदार यादीत नोंदणी करावीत, असे आवाहनही डॉ. कुलकर्णी यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, गुरुवार दि. 18, शुक्रवार दि. 19, शनिवार दि. 20 आणि सोमवार दि. 22 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार, 19 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स- https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
0000
केशव करंदीकर/व.स.सं