सामान्य लोकांच्या जलद न्यायासाठी पोलीस विभागाच्या अत्याधुनिकरणावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️नागपूर महानगरात १२००  किलो मीटर अंतराच्या ऑप्टीक फायबर केबलच्या माध्यमातून सुमारे ५८०० कॅमेऱ्याद्वारे निगराणी

▪️आता कानूनचे हातच नव्हे तर डोळेही अधिक सक्षम

▪️गुन्हेगारांच्या चेहऱ्यांसह आवाजाचीही होणार तत्काळ पडताळणी

नागपूर,दि. १७भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापर्यंत आपण इंग्रजांनी लादलेल्या कायद्याच्या अंमलाखाली न्यायाची प्रतिक्षा केली. हे कायदे बदलले तरच सर्व सामान्यांपर्यंत न्याय पोहचू शकेल, ही भूमिका घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी इंग्रजांनी त्यांच्या सोयीचे केलेले कायदे बदलण्याचे धैर्य दाखविले. आता या कायद्यातील बदलांमुळे व गृह विभागाला अत्यांधुनिक तंत्रज्ञानाची जोड आपण दिल्यामुळे सर्वसामन्यांना यापुढे न्यायासाठी अधिक काळ तिष्ठत बसावे लागणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व नागपूर पोलिस यांच्या संयुक्त विद्यमानाने गुन्हेगारीला आळा बसावा याउद्देशाने सिव्हील लाईन्स येथे स्थापित ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’च्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते. यावेळी विशेष समारंभात नागपूर शहर पोलिसांकडून विविध गुन्हांमध्ये तपास करुन जप्त केलेल्या सुमारे 5 कोटी 51 लाख 81 हजार रुपयांच्या मुद्देमालाचे संबंधित व्यक्तींना न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून  हस्तांतरण करण्यात आले. सन 2021 ते 2024 या कालावधीत विविध गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला हा मुद्देमाल होता. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल,  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, सह पोलीस आयुक्त आश्वती दोरजे, अतिरिक्त पोलीस उपायुक्त  सर्वश्री प्रमोद शेवाळे, संजय पाटील  व  मान्यवर उपस्थित होते.

पोलीस विभागातील आपण केलेल्या अत्याधुनिकीकरणामुळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रभावी वापरामुळे गुन्ह्यांवर आळा घालणे सोपे झाले आहे. नागपूर महानगरात सुमारे 1200 कि.मी. अंतराच्या ऑप्टीक फायबर केबलच्या माध्यमातून  जवळपास 5800 कॅमेऱ्यांचे इंटिग्रेशन या नव्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये करण्यात आले आहे. आता संपूर्ण महानगरात जागोजागी लावण्यात आलेले कॅमेरे व मॉल्स, शोरुम्स, रेल्वे स्टेशन, इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या जवळपास 2200 कॅमेऱ्यांचेही इंटिग्रेशन यात आहे. कोणत्याही स्थितीत गुन्हेगार आता सुटणे शक्य नाही. कोणत्याही एका कॅमेऱ्यात गुन्हेगार लक्षात येईल. त्याच्यावर आता  निगराणी ठेवता येईल, असे स्पष्ट करुन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यातील आधुनिकता लक्षात आणून दिली. चॅट जीपीटीच्या धर्तीवर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून गुन्हेगारांचा चेहरा व आवाजही या तंत्रज्ञानात ओळखणे  सुलभ झाल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस विभागातील आपण केलेल्या अत्याधुनिकीकरणामुळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रभावी वापरामुळे गुन्ह्यांवर आळा घालणे सोपे झाले आहे. मात्र, हळूहळू वाढणाऱ्या सायबर क्राईमपासून स्वत:ला सुरक्षित जर ठेवायचे असेल तर नागरिकांनी कोणत्याही मोहाला, आर्थिक लालसेला बळी न पडता स्वत: अधिक सावधगिरी व सुरक्षितता बाळगणे तेवढेच महत्त्वाचे आहे, या शब्दात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सावध केले. पैसे मिळविण्याचा कोणताही शॉर्टकट हा केव्हाही संकट ओढावू शकतो, असे ते म्हणाले.

विविध गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांकडून जप्त केलेला मुद्देमाल पोलीस स्टेशनमध्ये किती वर्ष खितपत ठेवावा यालाही मर्यादा असायला हव्यात. यासाठी ज्यांचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे त्यांच्या पर्यंत विविध तपासातून उघड झालेला व पोलीसांनी जप्त केलेला मुद्देमाल ज्याचा त्याला तत्काळ मिळावा यादृष्टीने कायद्यात नवीन झालेला बदल अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मॉ का सोना मुझे वापस मिला’ ही आता ज्याला मुद्देमाल भेटला त्याने दिलेली प्रतिक्रीया पोलीसांना मिळालेली मोठी पावती आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पोलीस विभागाचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या हस्ते सिंबा ॲपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी एव्हेरेस्ट वीर सहायक पोलीस निरिक्षक शिवाजी नन्नावरे यांचा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सह पोलीस आयुक्त आश्वती दोरजे यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन पोलीस निरीक्षक इसारकर यांनी केले.

०००