मुंबई, दि. 12 : राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत द्राक्ष, केळी, पपई, शेवगा व स्ट्रॉबेरी या पिकांचा नव्याने समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे आणि रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे यांनी दिले.
मंत्रालयात फळबाग योजनेत नवीन पिकांचा समावेश करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
द्राक्ष, पपई, केळी, शेवगा व स्ट्रॉबेरी या पिकांना यापूर्वी केंद्र शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत अनुदान देय होते. परंतु या कार्यक्रमांतर्गत उपलब्ध होणारा निधी क्षेत्रविस्तार या घटकाकरिता पुरेसा नसल्याने या पिकांना अनुदान देणे शक्य होत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीत नवीन पिकांना प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस कृषी, रोजगार, फलोत्पादन विभागाचे सचिव एकनाथ डवले, सहसचिव गणेश पाटील, कृषी विभागाचे आयुक्त सुहास दिवसे, फलोत्पादन विभागाचे सहसचिव अशोक अत्राम, फलोत्पादन विभागाचे संचालक शिरीष जमदाडे यांची उपस्थिती होती.
000
राजू धोत्रे/वि.सं.अ./12/3/2020