नंदुरबार शहराला तापी नदीवरून शाश्वत पाणीपुरवठा करणारी योजना महिनाभरात मंजूर करणार –  मंत्री डॉ. विजयकुमार गावित  

नंदुरबार, दि. १८ (जिमाका):  गेल्या दोन वर्षांपासून नंदुरबार तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे नंदुरबार शहराची तहान भागवू शकेल एवढा जलसाठा होवू शकला नाही. सध्या उपलब्ध जलस्रोतांच्या मर्यादा लक्षात घेवून पुढील २५ वर्षांतील वाढत्या लोकसंख्येच्या अंदाजाने शहराला तापी नदीवरून शाश्वत स्वरूपात पाणीपुरवठा करणारी योजना महिनाभरात मंजूर करणार असल्याची माहिती आज आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी सावनकुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी नतीशा माथूर, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे व संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री डॉ. गावित म्हणाले की, सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शहरात दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. सध्या तीन महिने पुरेल एवढाच जलसाठा सध्या शिल्लक आहे. शहराची वाढती लोकसंख्या व गरज लक्षात घेवून तापी नदीवरून पाईपलाईनद्वारे विरचक धरणाच्या पाणीपुरवठा योजनेला जोडणाऱ्या योजनेचा सुमारे दिडशे ते पावणेदोन कोटी रूपयांचा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. २०५६ पर्यंत वाढणारी शहराची लोकसंख्या विचारात घेऊन ही योजना तयार करण्यात आली असून माणसी दररोज १३५ लिटर शुद्ध  पाणी मिळेल या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून या योजनेला मंजूरी घेऊन विधानसभा निवडणूकीआधी  त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

योजनांसाठी लागणाऱ्या सर्व तरतूदींचा प्रस्ताव येत्या आठ दिवसात प्रशासनामार्फत शासनास सादर करण्यात येईल, असे यावेळी नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

०००