विशाळगड अतिक्रमणाबाबत कोणावरही अन्याय केला जाणार नाही  – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, दि. १८ : किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापूर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थनास्थळाचे नुकसान केले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करीत स्थानिक पीडितांशी संवाद साधून दिलासा दिला.

अतिक्रमणामध्ये संबंध नसलेल्या गावात गडावरुन परत येताना आंदोलकांनी मौजे मुसलमानवाडी येथे केलेल्या नुकसानाबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. सर्वांना तातडीची मदतही शासनाकडून देण्यात आली आहे. तसेच विशाळगड अतिक्रमणाच्याबाबतीत नियमांच्या बाहेर जाऊन कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी उपस्थित पीडितांना सांगितले. मुसलमानवाडी येथे विशाळगडावरील काही नागरिक व महिला आल्या होत्या. त्यांना सध्या विशाळगडावरील फक्त व्यावसायिक अतिक्रमणे काढली जात आहेत, न्यायप्रविष्ट अतिक्रमणे सोडून इतर अतिक्रमणे पावसानंतर काढली जातील, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले. यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्यासह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

घटनेआधी विशाळगडावर अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी केलेल्या मागणीवर सातत्याने प्रशासन विशेषत: जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर शासकीय अधिकारी चर्चा करत होते. त्यांना समजून सांगण्याचे काम करत होते. विशाळगडावरील जी अतिक्रमणे आहेत, जी न्यायप्रविष्ट आहेत, तसेच मुंबई उच्च न्यायालयात त्याविषयी काही खटले सुरु आहेत. तसेच न्यायालयाचाही अवमान होणार नाही, अशा पद्धतीचा मार्ग या ठिकाणी काढला जाईल, असे त्यांना सांगितले होते. हा मार्ग काढत असताना ॲडव्होकेट जनरल किंवा वरिष्ठ शासकीय वकील या सर्वांशी चर्चा केली जात होती. या संदर्भात सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, मुख्यमंत्र्यांशी प्रशासन संपर्क साधत होते. सर्व शांततेने घ्या, तुमची काय मागणी असेल याबद्दल सरकार कायदा आणि नियमांने सकारात्मक असेल. कायदा नियम हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर ते चालणार नाही, कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत बसून आपण मार्ग काढू, असे बोलणे त्यांच्याबरोबर झाल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी गावात सांगितले.

मुसलमानवाडीत झालेल्या नुकसानाबाबत तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना 25-25 हजार रुपये असे 50 हजार रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे. सर्व अधिकाऱ्यांनी नुकसानाबाबत तेथील सर्व गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत आणि त्या पाहून 2 कोटी 85 लाख रुपयांचा नुकसान भरपाई प्रस्ताव तयार केलेला आहे, अशी माहितीही त्यांनी गावातील नागरिकांना दिली.

घटनेचे संपूर्ण व्हीडिओ पोलिसांनी काढलेले आहेत. सगळ्या गोष्टींची संपूर्ण शहानिशा केली जाईल आणि त्यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल. राज्यामध्ये दूषित वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करू नये

विशाळगडाच्या घटनेबाबत प्रशासन आम्हाला वेळोवेळी माहिती देत होते. तरीही आपण स्वत: पाहणी करण्यासाठी आलो. पुढील काळात काही स्वयंसेवी संस्थाही मदत करणार आहेत. ही मदत तहसीलदारांमार्फत करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक दररोज याबाबत आढावा घेत आहेत. सरकारही यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही व्हिडीओ, आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करुन वातावरण खराब होईल, असा प्रयत्न करु नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्यातील जनतेला केले. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्यान घेतली आहे. चुकीच्या गोष्टींचे समर्थन सरकार करणार नाही. अशा प्रकारचे गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठी दरवर्षी शासन निधी देत असते. अशा शिवकालीन किल्ल्यांवर अतिक्रमण होवू नये, अशी मागणी शिवप्रेमी व इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांची आहे. समाजा-समाजामध्ये फूट पडेल, कारण नसताना जातीय सलोखा बिघडेल आणि त्याच्यामधून राज्यामाध्ये दूषित वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करु नये, असे त्यांनी आवाहन केले.

०००