मुंबई, दि. १९ : केंद्र सरकार शासकीय तंत्रशिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. शासकीय तंत्रनिकेतन अभियांत्रिकी संस्थांनी नव्या कल्पना समोर आणाव्यात, त्यानुसार उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल. महाराष्ट्राला अधिक प्राधान्य देऊन यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही देऊन याबाबतचा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठवण्याच्या सूचना केंद्रीय माहिती तंत्राज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्या.
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत उभारण्यात येणाऱ्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्स ॲण्ड ऑटोमेशन’ व आयआयटी थ्रीडी पेंटिंग यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक,विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जागतिक स्तरावर मागणी येईल, असे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येत असलेले उद्योगाचे आधुनिक तंत्रज्ञान असलेले पहिलेच उत्कृष्टता केंद्र आहे. उद्योगातील रोबोटिक्स तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी, रोजगार मिळवून देण्यासाठी आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी केंद्र उपयुक्त ठरेल. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रस्तावित नवउद्योगशील उपक्रम राबवून उद्योजकांकरिता कुशल मनुष्यबळ पुरविण्याचा उद्देश असल्याचे तंत्राशिक्षण संचालक डॉ.मोहितकर यांनी यावेळी सादरीकरणाच्या माध्यमातून सांगितले.
०००
काशीबाई थोरात/विसंअ