कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने सदैव कर्तव्यदक्ष राहावे – पालकमंत्री दादाजी भुसे

0
11

नाशिक, दिनांक 20 जुलै, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : शासन सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत समाविष्ट करून घेणे हा शासनाचा नियम आहे. आज 17 अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्ती देऊन त्यांचा पोलीस प्रशासन सेवेत प्रवेश झाला आहे. या सर्वांनी शासकीय सेवा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने सदैव कर्तव्यदक्ष राहावे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.

पोलीस मुख्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आयोजित अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप तसेच जिल्हा ग्रामीण पोलीस दलासाठी नवीन 75 दुचाकी वाहनांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्यासह अधिकारी व अनुकंपाधारकांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, मागील वर्षापासून वेगवेगळ्या शासकीय विभागातून अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत समावून घेण्याप्रती वेळोवळी पाठपुरावा केला असून आजमितीस 700 पेक्षा अधिक उमेदवारांना याचा लाभ प्रदान करण्यात आला आहे. शासन सेवेत कार्यरत असताना मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना, कुटुंबियांना एक आधार मिळावा हाच उद्देश यामागे होता. ज्या उमेदवारांना आज नियुक्ती मिळाली आहे त्यांची समाजाप्रती मोठी जबाबदारी आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने याचे भान ठेवून पुढील वाटचाल करावयाची आहे. चांगले कर्तव्य निभावल्यास निश्चितच समाजाकडूनही आपले कौतुक होईल यात शंका नाही. पोलीसांचे जीवन धकाधकीचे आहे. त्यादृष्टीने मालेगावच्या धर्तीवर येणाऱ्या काळात पोलिसांना चांगले निवासस्थान मिळण्याच्या दृष्टीने तसेच पोलीसदल सुसज्ज होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने नवीन वाहनांचा उपयोग निश्चित पोलीस दलास होईल, असा विश्वासही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यावेळी  नवनियुक्त अनुकंपाधारक उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तसेच नियुक्ती झालेल्या उमदेवारांनी पोलीस सेवेत जबाबदारीचे काम करावयाचे आहे. कर्तव्याप्रती सदैव जागरूक राहून चांगली सेवा बजवावी, अशा सूचना दिल्या. तसेच आज प्रदान करण्यात आलेल्या दुचाकी वाहनांचा पोलीसांना गुन्हे शोधण्यात नक्कीच उपयोग होईल. परंतु ही वाहने सुस्थितीत राहतील यादृष्टीने त्यांची देखभाल करणे देखील आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यावेळी म्हणाले,  नाशिक ग्रामीण पोलीस भरतीमध्ये अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या पात्र उमेदवारांना पालकमंत्री दादाजी भुसे  हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आलेत. यात  एकुण १६ पुरुष उमेदवार व १ महिला उमेदवार यांचा समावेश आहे. तसेच नाशिक ग्रामीण पोलीस दलाकरिता जिल्हा नियोजन समिती निधीमधुन एकूण ४५ हिरो होंडा शाइन मोटार सायकली प्राप्त झाल्या व त्यासाठी एकूण २५ लाख ९५ हजार १५० रूपये इतका निधी प्राप्त झाला होता. तसेच मा. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ३० बजाज पल्सर १२५ सीसी मोटार सायकल अशा एकूण 75 दुचाकी प्राप्त झालेल्या आहेत. सदर मोटार सायकलचा वापर करून डायल ११२ चे कॉल असतील अथवा दुर्गम भागात ज्या ठिकाणी चारचाकी वाहन जाणार नाही अशा ठिकाणी वेळेत पोहोचुन लोकांना मदत करणे पोलीस दलास शक्य होईल. नवीन कायद्यांची अंमलबजावणी व त्याकरिता आवश्यक असलेली वाहने ही उपलब्ध करून झाल्यामुळे जिल्हयातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना मदत करणे व गुन्हेगारीस आळा बसविणेकरीता निश्चितपणे उपयोग होईल असा विश्वास पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी ग्रामीण पोलीस बॅण्ड पथकाद्वारे पालकमंत्री दादाजी भुसे यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर पालकमंत्री यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन 75 नवीन दुचाकी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here