राज्य सेवा हक्क आयोगातील आवश्यक सेवा अंतर्भूत करून कोल्हापूर येथे पथदर्शी प्रकल्प राबविणार – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 22 :- महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाकडून नागरिकांना सेवा देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. सामान्य नागरिकांचे नियमित आणि महत्त्वाची सेवा प्रभावीपणे राबविण्यासाठी कोल्हापूर येथे 15 ऑगस्ट 2024 रोजी पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रकल्प) राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती  राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिली.

पावसाळी अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देतांना दिलेल्या आश्वासनासंदर्भात मंत्रालयात लोकसेवा हक्क आयोगाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा विषयक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे उपस्थित  होते. तसेच आमदार प्रकाश आबिटकर, कोल्हापूरचे  जिल्हाधिकारी अमोल येडगे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, महसूल, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत, कृषी आदी विभागामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची नेहमी कामे असतात. ही कामे वेळेत व्हावीत, यासाठी नागरिकांना या कायद्याअंतर्गत येणारी माहिती सर्व कार्यालयासमोर अधिकाऱ्यांच्या नावानिशी फलकावर देण्यात यावी. नागरिकांना पारदर्शक, जलद आणि कालबद्धरित्या राज्य सरकारकडून सेवा पुरविल्या जातील याची हमी नागरिकांना व्हावी, यासाठी सबंधित अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणीसाठी प्रभावी कार्यपद्धती उपयोगात आणावी. कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणाऱ्या प्रकल्पाची पूर्व तयारी करावी.

00000

राजू धोत्रे/विसंअ