राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त २९ जुलै रोजी ग्रंथाचे प्रकाशन

0
6

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते सोमवार, दि. २९ जुलै, २०२४ रोजी “वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व” या ग्रंथाचे प्रकाशन मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० ते ५.०० यावेळेत हा समारंभ आयोजित करण्यात आला असून यावेळी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील निवड केलेल्या सन्माननीय सदस्यांना “उत्कृष्ट संसदपटू” आणि “उत्कृष्ट भाषण” पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज विधान भवन, मुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती असेल.

 

सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतक महोत्सवी वाटचालीचा कालखंड असून त्यानिमित्त कार्यवृत्तामधून महत्वाच्या संदर्भांची निवड करत –

१) वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व

२) विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे

३) विधानपरिषदेतील विविध विषयांवरील महत्त्वपूर्ण चर्चा

४) शंभर वर्षे, शंभर भाषणे…

अशा प्रकारे चार विविधांगी विषयांवरील संदर्भसमृद्ध ग्रंथसंपदा वाचकांच्या भेटीस देत आहोत. ग्रंथ निर्मितीसाठी विधिमंडळ वार्तांकनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या ज्येष्ठ पत्रकारांची नियुक्ती करण्यात आली असून या मालिकेतील पहिल्या ग्रंथाचे प्रकाशन दि. २९ जुलै रोजीच्या या कार्यक्रमात होत आहे. अन्य तीन ग्रंथांचे काम देखील प्रगतीपथावर आहे. या ग्रंथ संकलन समिती सदस्यपदी ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री विलास मुकादम, योगेश त्रिवेदी, दिनेश गुणे, संजय जोग, उदय तानपाठक, किशोर आपटे आणि शीतल करदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि. २९ जुलै रोजी प्रकाशित होत असणाऱ्या ग्रंथाचे संकलन आणि संपादन किशोर आपटे आणि शीतल करदेकर यांनी केले आहे. वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि विधानमंडळातील ग्रंथालय यांच्या माध्यमातून ग्रंथ निर्मितीचे कार्य सुरू आहे.

माँटेग्यू-चेम्सफर्ड आयोगाच्या शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम १९१९ अन्वये “Bombay Legislative Council” ची प्रारंभिक बैठक दि. १९ फेब्रुवारी, १९२१ रोजी टाऊन हॉल मुंबई येथे झाली. त्यावेळी नारायण गणेश चंदावरकर यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना आहे. सन १८६२ ते सन १९२० पर्यंत Governor of Bombay यांच्या अध्यक्षतेखाली  Council चे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये नारायण चंदावरकर यांच्या रूपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. त्यानुसार सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषद शतकपूर्तीचा कालखंड मानावा लागेल. तथापि, सन २०२१ मध्ये कोविड-१९ च्या महामारीमुळे त्यावेळी हा “शताब्दी महोत्सव” समारंभ साजरा करू शकलो नाही, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर आणि विधानपरिषद उप सभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली.

या प्रसंगी राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा, विधान भवन, मुंबई यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या “उत्कृष्ट संसदपटू” व “उत्कृष्ट भाषण” या पुरस्कारांचे वितरणही या कार्यक्रमात केले जाणार आहे. दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य यांना मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे निमंत्रित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या गौरवशाली परंपरेतील या संस्मरणीय आणि ऐतिहासिक सोहळ्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही पीठासीन अधिकारी यांनी यावेळी केले.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here