नागरिकांची गैरसोय होणार नाही याची सर्व शासकीय यंत्रणांनी दक्षता घ्यावी – पालकमंत्री शंभूराज देसाई

ठाणे, दि.25 (जिमाका) :- राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासनाने, सर्व शासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुदाम परदेशी, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, तहसिलदार अभिजीत खोले, संजय भोसले हे प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात तर ठाणे जिल्हा प्रशासनातील व महानगरपालिकेतील क्षेत्रीय वरिष्ठ अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई यांनी सर्व यंत्रणांना अर्लट राहायला सांगितले असून महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक,नगरपालिका मुख्याधिकारी यांनी अतिशय दक्ष राहून संवेदनशीलतेने जिल्ह्यातील परिस्थिती हाताळावी. जिल्हयातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करावे. तेथील नागरिकांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी. गरज पडल्यास यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात पावसाचे पाणी थोडे जरी वाढले तर रस्त्यावर पाणी साचते या सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवावे. सर्वांनी 24 तास अर्लट मोडवर राहून प्रत्यक्ष फिल्डवर जावून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात,असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

पोलिसांनी पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर, प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष देणाऱ्यांवर लक्ष ठेवून तात्काळ कारवाई करावी,आवश्यक वाटल्यास पर्यटनस्थळांवर प्रवेश बंदी करावी, आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवावा. महानगरपालिका, नगरपालिकांच्या रुग्णालयांमध्ये तसेच ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मुबलक प्रमाणात औषध साठा ठेवावा. ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतील याची दक्षता घ्यावी. स्वच्छता विभागाने कुठेही अस्वच्छता राहणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पालकमंत्री महोदयांना ठाणे जिल्ह्यातील पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची तसेच जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनीही जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अर्लट मोडवर राहून आपत्कालीन उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देवून काम करावयाच्या सूचना संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.