मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत उद्योजक व खासगी आस्थापनांचा  सहभाग असेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

0
14

मुंबई,दि. २५: ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी’  ४० विविध क्षेत्रातील उद्योजक तसेच २० विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या खासगी उद्योजकांच्या संघटनांच्या प्रतिनिधीनी सहभाग घेतला आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे.कौशल्य विकास विभागामार्फत रोजगार देणा-या विविध आस्थापना,युवा आणि शासन यांच्यात उत्तम समन्वय साधला जाईल.ही योजना राज्याच्या विकासात योगदान देवून आमूलाग्र बदल घडवेल, दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार असून कुशल व रोजगारक्षम राज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेल असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी’ खासगी क्षेत्रातील उद्योजकांनी रोजगाराची मागणी नोंदविण्यासाठी आयोजित केलेल्या ‘उद्योजकांशी संवाद’ या बैठकीत कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील,आयुक्त निधी चौधरी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे  मुख्यमंत्री कार्यालयाचे व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे  नोडल अधिकारी ऋषीकेश हुंबे यासह राज्यातील ४० उद्योजक आणि २० उद्योगक्षेत्रातील  विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासाच्या विविध योजना सुरू केल्या आहेत. केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पातही  आगामी पाच वर्षात ४.१ कोटी  अधिक युवकांना रोजगाराची आणि कौशल्य विकासाची संधी देशात निर्माण करण्यासाठी दोन लाख कोटी रूपयांची तरतूद केली गेली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्याची संकल्पना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आहे. राज्याला विकासाकडे नेणारी ही योजना आहे. उद्योजक व विविध खासगी आस्थापना कुशल मनुष्यबळ नाही म्हणून खंत व्यक्त करत असतात हे लक्षात घेवून सर्वांनी एकत्र येवून राज्याच्या विकासात योगदान देणारी प्रत्येकाचा वैयक्तिक विकास करणारी ही योजना प्रभावीपणे राबवूया. असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

यावेळी ४० उद्योजक आणि २० उद्योगक्षेत्रातील  विविध संघटना यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये रोजगाराच्या संदर्भात नाव नोंदणी, उमेदवार आणि त्यांच्या पदवीनुसार आवश्यक नोकरीच्या संधी,रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम कसा असेल व योजनेच्या अनुषंगीक माहिती जाणून घेतली.

कौशल्य विकास विभागाचे सचिव श्री. पाटील यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व अमंलबजावणीसंदर्भात यावेळी माहिती दिली. आयुक्त श्रीमती चौधरी यांनी मुख्यमंत्री युवका कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये विविध आस्थापनांसाठी कोणकोणते निकष आहेत व कौशल्य विकास विभागाच्या कामकाजाबद्दल मनोगत व्यक्त केले.  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे  नोडल अधिकारी श्री. हुंबे यांनी प्रास्ताविक करूनआभार मानले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here