कारगिल विजयदिनी राजभवन येथून मेघालय, मिझोरम व त्रिपुरा या राज्यांसाठी तीन रुग्णवाहिका रवाना

मुंबई, ‍‍दि. २६: कारगिल विजय दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी राजभवन मुंबई  येथून मेघालय, मिझोरम व त्रिपुरा या तीन उत्तरपूर्व राज्यांसाठी तीन रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या. यावेळी संबंधित राज्यांच्या सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना व प्रतिनिधींना रूग्णवाहिकेच्या प्रातिनिधिक किल्ल्या देण्यात आल्या.

बोरिवली येथील अथर्व फाऊंडेशनच्या वतीने उत्तरपूर्वेतील उपरोक्त तीन राज्यांमधील माजी सैनिक तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या आरोग्य सेवेसाठी या रुग्णवाहिका भेट देण्यात आल्या आहेत.

अथर्व फाऊंडेशनने आतापर्यंत उत्तर पूर्वेतील सर्व राज्यांना रुग्णवाहिका भेट, हुतात्म्यांच्या मुलींना लॅपटॉप भेट देऊन तसेच बोरिवली येथे संरक्षण प्रदर्शन आयोजित करून प्रेरणादायी कार्य केले असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

कारगिल विजय दिनानिमित्त लष्करातील सेवेच्या संधी याबाबत युवकांना मार्गदर्शन केले जावे तसेच सैन्यात भरती होण्यास प्रोत्साहित केले जावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

कारगिल येथे सर्वात उंचीवर लढले गेलेले हे युद्ध होते व विपरीत स्थितीत आपल्या जवानांनी विजयश्री मिळविली, असे सांगून या युद्धात भारताने एक इंच देखील जमीन गमावली नाही, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. कारगिल युद्ध हे देशाच्या इतिहासातील महत्त्वाचे प्रकरण असून तो इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष व बोरिवलीचे आमदार सुनील राणे, उपाध्यक्षा वर्षा राणे, कर्नल एस चटर्जी व १५ आसाम रेजिमेंटचे जवान व अधिकारी उपस्थित होते.

०००