पुणे येथे कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे केंद्र स्थापण्यासाठी राज्य शासन आणि एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार

0
6

मुंबई, दि. 30 : पुणे येथे कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासन आणि एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य कराराचा लाभ राज्यातील युवकांना देशात व परदेशात रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी होणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक प्रमोद नाईक, सचिव स्मिता गाडे, एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेदमणी तिवारी, एनएसडीसी इंटरनॅशनल कंपनीचे सल्लागार संदीप कौरा, उपाध्यक्ष नितीन कपूर, राष्ट्रीय कौशल्य विकासचे प्रमुख मोहम्मद कलाम, व सर्व विभागाचे प्रधान सचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जगभरात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी देशातील युवकांना प्राप्त होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्यमशिलता मंत्रालयाकडून प्रसिध्द करण्यात येणाऱ्या रोजगाराच्या संधींच्या अनुषंगाने एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीकडून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम राबविण्यात येतात. राज्यामध्ये हे अभ्यासक्रम राबविण्यासाठी एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीसोबत हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार कंपनीतर्फे वेगवेगळ्या देशांमध्ये मनुष्यबळाच्या कौशल्याच्या गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त कंपनीकडून विद्यार्थ्यांना परदेशातील नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला प्रशिक्षण केंद्रासाठी पुण्यातील शासकीय दूरशिक्षण तंत्र निकेतन संस्थेची जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आजच्या सामंजस्य करारप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्यावतीने तंत्रशिक्षण विभागाचे संचालक प्रमोद नाईक यांनी, तर एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेदमणी तिवारी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here