जपानने महाराष्ट्राच्या उद्योग, पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
12

मुंबई दि.३१- महाराष्ट्र हे उद्योगस्नेही आणि गुंतवणूकीसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. अनेक जपानी कंपन्या राज्यात चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. भविष्यात देखील जपानने राज्यात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी आज मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.आय एस चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, जपानी शिष्टमंडळातील प्रतिनिधी शिमाडा मेगूमी उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी श्री. कोजी यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच आजच महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी टोयोटा किर्लोस्कर सोबत करार करण्यात आला आणि श्री. कोजी यांनी महाराष्ट्राला भेट दिली हा चांगला योगायोग आहे. पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की भारत आणि जपान हे आशिया खंडातील महत्वाचे देश असून दोन्ही देशात खूप जुने आणि मजबूत संबंध आहेत. महाराष्ट्र हे भारतातील गुंतवणूकीसाठी उद्योगांच्या पहिल्या पसंतीचे राज्य आहे. जपानी कंपन्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली असून राज्याच्या आणि मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासात देखील मोठे सहकार्य दिले आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन ही याची उदाहरणे आहेत. आमच्या सरकारच्या माध्यमातून एमटीएचएल अपेक्षीत वेळच्या आत पूर्ण करण्यात येऊन जनतेसाठी खुला करण्यात आला. तर बुलेट ट्रेनच्या कामाला सुद्धा मोठा वेग देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.


जपानी कंपन्यांसाठी पुणे जिल्ह्यातील सुपे येथे विशेष इंडस्ट्रीयल पार्क विकसित करण्यात येणार असून भविष्यात देखील राज्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी श्री. कोजी यांनी भारत आणि जपान यांचे संबंध अधिक मजबूत व्हावेत, ही आमची भूमिका आहे. आज टोयोटा किर्लोस्कर कंपनीने राज्यात केलेला गुंतवणूकीचा करार हा महाराष्ट्रातील उद्योगस्नेही वातावरणाचे द्योतक आहे. एमटीएचएल आणि बुलेट ट्रेन सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून जपान महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात जपान सहभागी आहे, याचा आनंद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जपानचा सहभाग असलेले प्रकल्प वेगाने मार्गी लागले आहेत, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतूक केले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बांबूपासून तयार केलेल्या विविध वस्तू भेट देऊन श्री. कोजी यांचे स्वागत केले.
००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here