चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील घरकुलांसंदर्भात केंद्रीयस्तरावर पाठपुरावा करु – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

0
16

मुंबई, दि. 2 :- चंद्रपूर शहर महानगरपालिका येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी 10 हजार घरे बांधण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेला गती द्यावी. महानगरपालिकेने त्यासाठी म्हाडाचे सहकार्य घ्यावे. राज्य व केंद्रीय स्तरावर याबाबत तांत्रिक अडचणी असतील तर त्या दूर केल्या जातील. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबतही बैठक घेण्यात येईल, अशी माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महाप्रीत आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या वतीने चंद्रपूर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खासगी भागीदारीद्वारे घरांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे श्री. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. ‘महाप्रीत’चे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपजिल्हाधिकारी डी.एस. कुंभार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

वन मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर महानगरपालिकेने घरकूल प्रकल्पासाठी  म्हाडाच्या अखत्यारित  असलेल्या उपलब्ध जागेसंदर्भात सामंजस्य करार केला आहे. ‘महाप्रीत’मार्फत 3600 घरे बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजना, म्हाडा, कामगार कल्याण मंडळ आदींच्या योजनांचा लाभ घेतला, तर घरांच्या किंमती कमी होऊ शकतील. याठिकाणी अनुसूचित जाती-जमाती घटकांची लोकसंख्या असेल तर तेथील पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन घेता येईल. याशिवाय. वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड यांच्याकडूनही या योजनेसाठी मदत घेता येईल. मात्र, या प्रक्रियेला वेग देण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर पाठपुरावा करुन मान्यता मिळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

0000

दीपक चव्हाण/विसंअ

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here