छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)- सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील घाटनांद्रा बंधारा यावरील प्रकल्पयाचे पुनर्रचना आणि बांधणी करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रकल्पाचा आराखडा तयार करून तात्काळ मंजुरी घ्यावी व जलसंधारणाचे काम पूर्ण करावे,असे निर्देश राज्याचे पणन वअल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जलसंपदा विभागाला दिले.
सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील जलसंधारण प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे. जिल्हा जलसंधारण अधिकारी यतीन कोठावळे, कार्यकारी अभियंता सब्बिनवार, सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्यासह सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील जलसंधारण विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री सत्तार म्हणाले की, शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या प्रकल्पाच्या माध्यमातून सोडवला जाणार आहे. सोयगाव येथील धरणाची उंची वाढवण्याबाबत व सूक्ष्म सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी खेळणा प्रकल्प दुरुस्ती सह नवीन बंधारे तयार करण्याची काम हाती घ्यावे. यासाठी तात्काळ वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय करून जलसंधारण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री सत्तार यांनी दिले. अजिंठा येथील मुख्य प्रवेशद्वाराची दुरुस्ती त्याचप्रमाणे इतिहासकालीन दरवाजाची दुरुस्ती करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. इतिहासकालीन दरवाजाचे पुनरुज्जीवन करताना पुरातत्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दर्जेदार काम करावे,असेही सत्तार यांनी सांगितले.