बीड दि. ५ (जिमाका) :कडा (ता. आष्टी) येथे भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या एका गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलीसांनी कारवाई केली. यावेळी दूध भेसळीसाठी वापरले जाणारे १३,३६८ किलो रासायनिक पदार्थ जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या रासायनिक पावडरची किंमत ११ लाख ८५ हजार ६८ रुपये आहे.
ही कारवाई पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनात, तसेच छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशाने राबविण्यात आली. मागील तीन दिवसांपासून याबाबत गोपनीय पद्धतीने मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत बीड, अहमदनगर आणि धाराशिव येथे आज पहाटे धाड टाकून कार्यवाही करण्यात आली आहे.
बीड-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील साईदत्त एंटरप्रायझेस नावाच्या दुकानाजवळ पत्र्याच्या शेडमधील गोदामात भेसळयुक्त दूध तयार करण्यात येत होते. येथे दूध तयार करण्यासाठी 13368 किलो भेसळ म्हणून वापरला जाणारा पदार्थ जप्त करण्यात आला. यामध्ये एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. अंबादास पांडुरंग चौधरी यांचे हे गोदाम होते.
गोपनिय माहितीच्या आधारे अन्न अन्न व नागरी पुरवठा आणि पोलीस प्रशासनाने रविवारी पहाटे धाड टाकली. गोडाऊनची पाहणी केली असता भेसळयुक्त दुधाची निर्मिती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा मोठा साठा आढळून आला. 6 लाख 87 हजार 672 रुपयांची पोटॅशियम हायड्रॉक्साइड फ्लेक्स, कॉस्टिक पोटॅशियम फ्लेक्स, ट्राय सोडियम सिक्रेट, कॉस्टिक सोडा फ्लेक्स ही भेसळ 6,942 किलो आढळून आली.
संबधित गोदाम पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले आहे.
०००