छत्रपती संभाजीनगर दि. ७: भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात रविवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी होणार असून यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून जबाबदारी पार पाडण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज येथे दिले.
स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त श्री. गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी महसूल, पोलीस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, माहिती विभाग आदीसह विविध कार्यालयांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. गावडे म्हणाले की, मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळी स्वच्छता करणे, रंगरंगोटी, कुंड्या ठेवणे, पताका लावणे, गणमान्य व्यक्ती व अधिकाऱ्यांना उभे राहण्यासाठी चौकट रंगविणे आदी कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याबाबत तसेच ध्वजवंदन समितीने ध्वज स्तंभ, राष्ट्रध्वज, ध्वजाला मानवंदना, पोलीस पथकांची, बँड पथकाची नियुक्ती आदी कामे वेळेत पूर्ण करावीत अशा सूचनाही श्री. गावडे यांनी बैठकीत दिल्या.
उपायुक्त मिनीयार यांनी स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत शासनाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत माहिती दिली.
०००