बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या अपात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्क्कम तातडीने द्यावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

0
9

मुंबई, दि. ७ : चंद्रपूर व बुलढाणा येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तसेच इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत नुकसानभरपाई  देण्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी मर्यादित कालावधीत कारणे न देता अपात्र ठरविले आहे, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पात्र ठरवून विमा रक्कम अदा करण्यासंदर्भात ३१ ऑगस्ट पर्यंत कायर्वाही करण्याचे निर्देशही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

मंत्रालयात चंद्रपूर आणि बुलडाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी पिकासंदर्भात संबंधित कंपन्यांनी  केलेल्या कार्यवाहीचा आढावा कृषिमंत्री श्री.मुंडे यांनी घेतला.

यावेळी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात माहिती दिली आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना कंपनी प्रतिनिधींना दिल्या.

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2023 चे 119 कोटी तर खरीप हंगामातील 55 कोटी रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित १२७ कोटी ७४ लाख रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याबद्दल सर्वच लोकप्रतिनिधी यांनी श्री.मुंडे यांचे आभार मानले.

श्री.मुंडे म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ओरिएन्टल विमा कंपनीकडे एकूण ३ लाख ५० हजार ९६९ शेतकरी अर्जाद्वारे सहभागी झाले आहेत. विमा कंपनीने ३ लाख ४१ हजार २३३ पात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना तातडीने निधी वितरीत करावा. तसेच, मानवी दृष्टीने आणि अपात्रतेची कारणे वेळेत शेतकऱ्यांना न दिल्याने संबंधित ९७३६ शेतकऱ्यांना तातडीने पात्र ठरवून त्यांना विमा रक्कम अदा करावी. त्यांना भरपाईपोटी २०८ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी ८० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून १२७ कोटी रुपये वाटप करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

तसेच बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत २०५१ शेतकऱ्यांच्या सूचना प्राप्त असून, २०३० शेतकऱ्यांचे सर्वेक्षण झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले नाही, त्याची कारणे तात्काळ सादर करावीत. तसेच अपात्र ठरविलेल्या १३१८ शेतकऱ्यांनाही भारतीय कृषी विमा कंपनीने पात्र ठरवून त्यांना विमा रक्कम अदा करावी. दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने संबंधित कंपन्यानी तातडीने कार्यवाही करावी अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना मंत्री श्री.मुंडे यांनी दिल्या.

बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडून पीक विमाबाबत हरकती दाखल करण्यास ७३ तासांपेक्षा जास्त उशीर झाला असेल किंवा तसेच ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाइन तक्रारी दाखल केल्या असतील त्या सर्व तक्रारी ग्राह्य धरून ३१ ऑगस्टपर्यंत अपात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरवून विम्याची रक्कम अदा करण्याचे आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

या बैठकीस केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, आमदार संजय रायमूलकर, आमदार श्वेता महाले, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, आमदार डॉ.संजय कुटे, कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा, उपसचिव प्रतिभा पाटील, उपसचिव नीता शिंदे, भारतीय कृषी विमा कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक मच्छिन्द्र सावंत, कृषी आयुक्तालयाचे वैभव तांबे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे, भारतीय कृषी विमा कंपनीचे उपप्रबंधक सचिन हराळ, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अभिजित उद्धव आदी मान्यवर उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here