- सर्वांच्या साथीने इथपर्यंत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्र ग्रंथाचे प्रकाशन
ठाणे,दि. ७,(जिमाका): भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानले जाते. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि डॉ. अरुंधती भालेराव, राजन बने व सान्वी ओक लिखित ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथील नाट्यगृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून हा चरित्र ग्रंथ मंचावर आणून याचे प्रकाशन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री शंकर बाबा पापळकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, साहित्य संमेलन अध्यक्ष रवींद्र शोभणे, शारदा एज्युकेशन सोसायटीचे विलास ठुसे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन म्हणाले की, मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळाली आहे, हे मी माझे भाग्यच समजतो. मला याचा मनस्वी आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपली संस्कृती टिकली नसती. त्यांच्या महान कार्यामुळेच महाराष्ट्राचे नाव आज संपूर्ण देशात आदराने घेतले जाते. आधीच्या वक्त्यांनी केलेल्या भाषणातून आणि जमलेल्या जनसागराकडे पाहून माझी अशी खात्री झाली आहे की, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत.
राज्यपाल पुढे म्हणाले की, पुस्तके कधीही फुकट घेऊन वाचू नयेत. पुस्तकाचे मूल्य देऊन पुस्तके वाचल्यास आपल्या भावना त्या पुस्तकाचे वाचन करताना एकजीव होतात, त्यातील मतितार्थ आपल्याला समजतो, असे माझे व्यक्तिगत मत आहे.
भारतीय लोकशाहीच्या महानतेमुळेच श्री. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री तर श्री. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले.
जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले की, कोरोना काळात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केलेले काम हा महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. त्यांनी गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्या भागात केलेले काम हे अतिशय वाखाणण्याजोगे आहे. मनापासून एखादे काम करणे, ही इच्छाशक्ती असणे यातूनच व्यक्ती समाजासाठी काहीतरी करू शकतो, तसे काम मुख्यमंत्री श्री. शिंदे सतत करताना दिसून येतात. २०४७ साली भारत हा महासत्ता बनणार यात शंकाच नाही. विशेष म्हणजे हे शासन ज्या प्रकारे काम करीत आहे त्यातून महाराष्ट्राचा विकास हा होणारच.मी महाराष्ट्रात जनतेचा सेवक म्हणून आलो आहे. त्यामुळे शक्य तितकी जनसेवा करण्याचा संकल्प मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करीत आहे, असे ते शेवटी म्हणाले.
सर्वांच्या साथीने इथपर्यंत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्यावर पुस्तक लिहिण्याइतपत मी असे काही मोठे काम केलेले नाही. सर्वांच्या साथीने मी इथपर्यंत पोहोचलो आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार. सत्तेचा वापर हा गोरगरिबांच्या कल्याणासाठीच व्हायला हवा. मला काय मिळाले, यापेक्षा मी समाजाला काय दिले हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच मी या मार्गावर काम करण्याचा प्रयत्न करतोय. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे, आणि उद्याही मी कार्यकर्ताच राहणार आहे. मी असे मानतो की, सी. एम. म्हणजे कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणूस. त्याआधारे काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. माझ्याकडे आलेला माणूस रिकाम्या हाताने कधीच जात नाही आणि कधी जाणारही नाही. संपूर्ण महाराष्ट्र हे मी माझे कुटुंब मानतो. यश आले तर हुरळून जाऊ नये आणि अपयश आले तर खचून जावू नये, ही आईची शिकवण मी आजही कायम स्मरणात ठेवली आहे. हे शासन चोवीस तास लोककल्याणासाठी काम करीत आहे. हे शासन विकास आणि कल्याण याची सांगड घालून लोकांसाठी चांगल्या योजना राबवीत आहे. यापुढेही हे शासन लोककल्याणाचा विचार करूनच निर्णय घेणार, राजकीय हिताचे कधीही निर्णय घेतले जाणार नाहीत.
शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस येण्यासाठी आम्ही सर्व एकत्र मिळून प्रयत्नशील आहोत. त्यामुळे जे काम करीत आहोत ते सर्वसामान्य जनतेसाठीच. यामुळे माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी समाजासाठी काम करीत राहणार, माझ्या या सर्व वाटचालीत माझ्या पत्नीचा खूप मोठा वाटा आहे. तिची खंबीर साथ मला नेहमी समाजासाठी काम करण्याची सदैव प्रेरणा देते. माझ्या या सामाजिक कार्यात माझे सर्व कुटुंबिय सदैव माझ्या पाठीशी असतात, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी देव, देश आणि धर्मासाठी लढणे हा मंत्र जपला होता आणि आधुनिक युगात हा मंत्र जपताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कृतीतून दिसतात. त्यांची संयमी वृत्ती, लोकांचे ऐकून घेण्याची प्रवृत्ती, कठोर मेहनतीची तयारी, विविध पदांना न्याय देण्याची वृत्ती हे त्यांचे गुणविशेष अनुकरणीय आहेत. जनतेत राहून जनतेसाठी काम करणे, हा ध्यास घेतलेला लोकनेता एकनाथ शिंदेंकडे पाहिले की दिसून येतो. संघर्षाला शांतपणे तोंड देण्याची वृत्ती, मित्रांप्रती कर्तव्य हेही त्यांचे गुणविशेष आहेत. अशा व्यक्तीचा चरित्र ग्रंथ प्रकाशित होणे, हे निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक असते. अशा व्यक्तींचे चरित्र वाचल्यावर ते सर्वसामान्यांना नेहमीच प्रेरणा देतात आणि त्यातून सर्वसामान्य नागरिक घडतातही.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाची शिकवण अवघ्या महाराष्ट्राला दिली. त्यांच्या शिकवणीचे अनुकरण करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. लोकांच्या सदैव गराड्यात राहणारा मुख्यमंत्री, शेतीची आवड असणारा मुख्यमंत्री, गावाकडे रमणारा मुख्यमंत्री ही सर्व विशेषणे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना लागू होतात. त्यांच्या सर्व यशात त्यांच्या सर्व कुटुंबियांचेही मोठे योगदान आहे.
याप्रसंगी पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाविषयी अनेक उदाहरणे देऊन ते सर्वसामान्यांचे नेते आहेत, ते लोकनेते आहेत, ते अनाथांचे नाथ आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली तर सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर यांनी केले. या चरित्र ग्रंथाचे लेखक प्रा.डॉ.प्रदीप ढवळ यांनी मनोगत व्यक्त करताना या चरित्र ग्रंथाच्या निर्मिती विषयीची माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, पुस्तकाचे लेखक प्रा.डॉ.प्रदीप ढवळ, डॉ.अरुंधती भालेराव, राजन बने आणि सान्वी ओक तसेच ग्रंथाली प्रकाशनचे सुरेश हिंगलासपूरकर यांचा राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून तसेच राष्ट्रगीत व राज्यगीताने करण्यात आली. शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.विलास ठुसे यांनी आभार मानले.
०००