मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम पात्र नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदणी करण्याचे आवाहन

0
4

मुंबई दि 8:- मतदारांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर देण्याच्या उद्देशाने 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (2) मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येत असल्याची माहिती मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

पात्र नागरिकांनी त्यांची नावे मतदारयादीत नोंदणी करावीत, असे आवाहनही श्री. क्षीरसागर यांनी केले आहे.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे यासंदर्भातील पत्रकार परिषद झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ हे उपस्थित होते.

ऑनलाईन पद्धतीनेही नोंदणी, दुरुस्ती व नाव स्थलांतराची कामे

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर म्हणाले, छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम याअंतर्गत प्रामुख्याने मतदारयादीत नाव नसलेले नावनोंदणी करु शकतात, नावांमधील दुरुस्ती करून घेवू शकतात तसेच नाव स्थलांतरित करुन घेवू शकतात. ही सर्व कामे ऑनलाईन पद्धतीनेही करता येतील. यासाठी बीएलओंमार्फत गृहभेटी कार्यक्रमही आखण्यात आला असल्याचे श्री क्षीरसागर यांनी सांगितले.

10 व 11 ऑगस्ट 2024 (शनिवार व रविवार ) तसेच शनिवार दि 17 व रविवार दि 18 ऑगस्ट 2024 रोजी मतदार नावनोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यावर भर

मुंबई उपनगर जिल्ह्यात सध्या 7574 मतदान केंद्र असून मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठीही विविध पावले उचलण्यात येत असून याअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. दोन-तीन गृहनिर्माण संस्थां मिळून एक मतदान केंद्र करण्यावरही भर देण्यात येत आहे. 553 मतदान केंद्र सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत.

 इमारतीत मतदान केंद्र हलविण्यावर भर

तात्पुरती, मंडपातील मतदान केंद्रांची संख्याही कमी करुन पक्क्या इमारतीत ही मतदान केंद्रे हलविण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे श्री क्षीरसागर यांनी सांगितले.

मतदार याद्यांचा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या मार्फत घरोघरी सर्वेक्षण, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, पुनर्रचना, मतदारयादीमधील तफावत दूर करणे, अस्पष्ट, निकृष्ट दर्जाचे फोटो बदलून चांगल्या प्रतीचे फोटो सुनिश्चित करणे, मतदार यादीमधील विनिर्देशन आणि मानवेतर प्रतिमा, जेथे आवश्यक असेल तेथे बदल करणे. विभागांची पुनर्रचना करणे आणि विभाग सीमांच्या प्रस्तावित पुनर्रचनेस अंतिम रुप देणे, त्यानंतर मतदान केंद्रांच्या यादीची मान्यता घेणे. कंट्रोल चार्ट अद्यावतीकरण करणे, नमुना एक ते आठ तयार करणे, ता. १ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादीची तयारी करणे (मंगळवार, ता. २५ जून २०२४ ते सोमवार, ता.५ ऑगस्ट २०२४)

प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे : मंगळवार (६ ऑगस्ट), मतदार यादीवरील दावे व हरकती स्वीकारणे ( ६  ऑगस्ट ते २० ऑगस्ट). विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून निश्चिती नुसार.

दावे व हरकती निकाली काढणे, अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मिळवणे, डेटाबेस अद्ययावत करणे व पुरवणी यादी तयार करणे यासाठी गुरुवार (ता. २९ ऑगस्ट) पर्यंत मुदत आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी शुक्रवार (ता. ३० ऑगस्ट) प्रसिध्द करण्यात येणार आहे.

—–000——-

केशव करंदीकर/व.स.सं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here