अधिकाधिक महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ घ्यावा – मंत्री दादाजी भुसे

योजनेचे अर्ज ३१ ऑगस्टपर्यंत स्वीकारण्यात येणार

धुळे, दि. ८ (जिमाका) : राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे अर्ज 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन स्वीकारण्यात येणार आहे. या योजनेचा धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी केले.

साक्री विश्रामगृह येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आढावा बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय बांबळे, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, तहसीलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीष जाधव आदी उपस्थित होते.

मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत धुळे जिल्ह्यात ज्या महिला लाभार्थ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी केली  त्यांच्या अर्जांची काटेकोरपणे छानणी करावी. एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी. त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या अर्जांत त्रूटी आढळून आल्या आहेत त्यांच्या त्रृटींची पुर्तता संबंधितांना कळवुन त्रुटींची त्वरीत पुर्तता करुन घ्यावी. महिला व बालविकास विभागाने योजनेचे लाभार्थी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी योजनेची मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. ज्या लाभार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज दाखल केले असतील ते अर्ज ऑनलाईन भरण्यात यावेत. अशा सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्यात.

मंत्री श्री. भुसे यांनी केली कार्यक्रमस्थळाची पाहणी

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत भाडणे, ता. साकी, जि.धुळे येथे शनिवार, दि. 10 ऑगस्ट, 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत साक्री, उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन, आदिवासी विकास विभागाच्या विविध विकास कामांचे उद्धाटन तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य कार्यक्रम व मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाच्या मुख्य स्थळास मंत्री दादाजी भुसे यांनी आज भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, तहसीलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, अपर तहसिलदार दत्ता शेजुळ यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री.भुसे म्हणाले की, मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वीपणे पार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते  नियोजन करावे. कार्यक्रमस्थळी एलईडी स्क्रीन, राज्यशिष्टाचारानुसार आसन व्यवस्था, स्टेज वरील उद्घाटन ते समारोप पर्यंत स्टेजवरील नियोजन करावे. मान्यवर तसेच लाभार्थी यांच्या बसण्याची जागा निश्चित करावी. आरोग्य विभागाने महिलांची तपासणीसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करावे. राज्य शासनामार्फत विविध विभागामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल उभारण्यात यावेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सभास्थळी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. कार्यक्रमाच्या दिवशी येणाऱ्या नागरीक, लाभार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी, जेवण तसेच प्रसाधनगृह कार्यक्रमस्थळी स्वच्छतेच्या अनुषंगाने साफसफाई तसेच रुग्णवाहिकेची  सोय करावी. लाभार्थ्यांच्या संख्येनुसार आवश्यक बसेसचे नियोजन करावे. लाभार्थी तसेच मान्यवरांच्या पार्किंगच्या ठिकाणी कंट्रोल रुम स्थापन करावे. नागरिकांची कुठलीही गैरसोय होवू नये याची दक्षता घ्यावी. वाहनतळ ते कार्यक्रमस्थळावरील मार्गावर वाहतुकीचे नियोजन व्यवस्थीत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्यात.

जिल्हाधिकारी श्री.पापळकर यांनी मंत्री श्री. भुसे यांना मुख्य सभा मंडप, मान्यवर पार्किंग, लाभार्थी व नागरिकांची बैठक व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत तसेच बचत गटामार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, वाहन पार्कीग व्यवस्था, हेलीपॅड आदीविषयी माहिती दिली.

०००