मुंबई शहर जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम सुरु; नवयुवकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी – जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन

0
9

मुंबई, दि. ९ : आगामी निवडणुकांमध्ये कोणताही मतदार मतदानापासून  वंचित राहू नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम सुरू आहे दि. १ जुलै २०२४ रोजी ज्या व्यक्तीचे वय १८ वर्षे  किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा नवयुवकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींकरिता देखील नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नवीन मतदार  होऊ इच्छिणाऱ्या दिव्यांग व्यक्तींनी  दिनांक १ जुलै २०२४ रोजी  १८ वर्ष पूर्ण केली असतील, तर त्यांनी अर्ज क्रमांक ६ भरावा. ज्या दिव्यांग व्यक्तींकडे यापूर्वी मतदार ओळखपत्र उपलब्ध आहे. परंतू दिव्यांग मतदार म्हणून नोंद केली नसेल, अशा व्यक्तींनी अर्ज क्रमांक ८ भरून दिव्यांग मतदार यादीत नाव नोंद करून घ्यावी, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये  मतदानादिवशी देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांना देता येईल, असे जिल्हाधिकारी  श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

हे अर्ज आपल्या घराजवळील मतदार नोंदणी  अधिकारी, विधानसभा निवडणूक कार्यालयात उपलब्ध आहेत. त्याच कार्यालयात अर्ज भरून जमा करता येतील. निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या वेबसाईट अर्ज करून नवीन मतदार नोंदणी करू शकतात. ही नोंदणी दिनांक 6 ऑगस्ट २०२४ ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये सुरु राहणार आहे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनेही मतदारांची नोंदणी,

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रामुख्याने मतदार यादीत नावनोंदणी, नावांमधील दुरुस्ती तसेच नाव स्थलांतरित करुन घेवू शकतात. ही सर्व कामे ऑनलाईनसह  ऑफलाईन पद्धतीनेही करता येतील. यासाठी बीएलओंमार्फत गृहभेटी कार्यक्रमही सुरू आहे. दि. 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत मतदान नोंदणीची मुदत आहे. तसेच दि.10 व 11 ऑगस्ट 2024 (शनिवार व रविवार) तसेच शनिवार दि 17 व रविवार दि. 18 ऑगस्ट 2024 रोजी मतदार नावनोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यावर भर

मतदान केंद्रांवरील गर्दीमुळे अनेकजण मतदान करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, मतदानाचा टक्का घसरतो. मुंबईत मतदान केंद्रांवरील  गर्दी कमी  करण्यासाठी  आणि  मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.  याअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.  गृहनिर्माण सोसायट्यांमधील  मतदान  केंद्र ६९ वरून २५५ इतकी करण्यात आली आहेत. तसेच तात्पुरती, मंडपातील मतदान केंद्रांची संख्याही कमी करुन पक्क्या इमारतीत ही मतदान केंद्रे स्थलांतरीत करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी विधानसभा मतदान केंद्रावर  उपलब्ध असून नागरिकांना आणि राजकीय पक्षांना पाहता येईल.

मतदान  केंद्रांवर मतदारांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.   एकाच केंद्रावर एकाच कुटुंबातील सदस्यांना मतदान करता येईल, अशा स्वरूपाचे नियोजन केले आहे. तसेच झोपडपट्टीसह अन्य गर्दीच्या ठिकाणी मतदान  केंद्र वाढविण्यात आले आहेत. महाविद्यालयांसह मुंबई शहरात जनजागृती केली जात आहे. यामुळे मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी  मदत होईल, असा विश्वासही मुंबई शहर जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी व्यक्त  केला.

०००००

काशीबाई थोरात/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here