‘हर घर तिरंगा घर घर तिरंगा’ उपक्रम विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन यशस्वी करावा-पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. ९ :  ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करावा. तसेच प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचाही सहभाग घ्यावा, असे निर्देश  पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ उपक्रमासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व गट विकास अधिकारी उपस्थित होते.

 

‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत सातारा शहरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या उपक्रमांतर्गत शासकीय कार्यालये व जिल्ह्यातील धरणांवर विद्युत रोषणाई करावी.  प्रशासनाने सेल्फी पॉईंट, बचत गट यांचा तिरंगा मेलाचे आयोजन करावे. अशा सूचनाही त्यांनी केल्या.

०००

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत निधी वाटपाच्या कार्यक्रमासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. ९:  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात 5 लाख 21 हजार 17 इतके ऑनलाईन  अर्ज प्राप्त झाले असून  यापैकी 5 लाख  10 हजार 419 इतक्या अर्जांना   मान्यता दिली आहे.  याची टक्केवारी 98.42 असून या योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथे होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपमुख्य कार्यकारी  अधिकारी अर्चना वाघमळे,   महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व गट विकास अधिकारी उपस्थित होत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या अर्जांना मंजुरी दिलेली नाही त्या अर्जाना तात्काळ मंजुरी द्यावी, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई सांगून मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे चांगल्या पद्धतीने नियोजन करावे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त महिला लाभार्थी येतील यासाठी नियोजन करावे.  महिलांसाठी वाहनांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही  त्यांनी केल्या.

या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला.  यावेळी  5 युवकांना नियुक्तीचे पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते देण्यात आले.  तसेच वीर पत्नी साधना साळुंके, अतित ता. खंडाळा यांना शासनाकडून  2 हेक्टर जमीन वाटपाच्या आदेशाचे प्रदान करण्यात आले.

०००