- ‘आयसीएआय’च्या विदर्भ कॉन्क्लेवचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर, दि. १०: वस्तू व सेवा कर रचनेमुळे (जीएसटी) देशात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. गत सात वर्षात देशाच्या करामध्ये दुपटीपेक्षा वाढ झाली. यानुरूप नवीन कायदे आले. कर विषयक कायदे, आर्थिक जबाबदारी याविषयी जनसामान्यांना साक्षर करुन सर्वांना आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंटस् (सीए) यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
‘द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस् ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) नागपूर शाखेच्यावतीने सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये आयोजित दोन दिवसीय विदर्भ कॉन्क्लेवचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते. आयसीएआयच्या नागपूर शाखेचे प्रमुख अक्षय गुल्हाने यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, देशात जीएसटीच्या माध्यमातून नवी करप्रणाली लागू झाली व अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडून आले. भारतामध्ये करप्रणाली यशस्वी होण्याबद्ल जगातील बड्या देशांना साशंकता निर्माण झाली होती. मात्र, जीएसटीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे व देशात निर्माण झालेल्या जीएसटीएन नेटवर्कमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलनाची सुदृढ पद्धत निर्माण झाली आहे व देश जागतिक अर्थव्यवस्थेत अग्रणी स्थानावर आला आहे. भारतात सीएंची महत्वाची भूमिका आहे. अकाउंटंटस् सोबत अकाउंटीबिलीटी अर्थात जबाबदारीही जुळली आहे. ही जबाबदारी समाजाला दिशा देत असते हे लक्षात घेत या नव्या करप्रणालीमुळे झालेल्या सर्व आर्थिक बदलांचा स्वीकार करत आयसीएआयने या करप्रणालीबाबत सर्वसामान्यांना साक्षर करावे, असेही त्यांनी सांगितले.
करप्रणालीसह गरीबी निर्मूलनात देशाची वाटचाल सुरु आहे. गेल्या १० वर्षात २५ कोटी लोकांना गरीबीमुक्त केले आहेत. नव्या करप्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीतून महाराष्ट्राची आर्थिक घोडदौड सुरु आहे. वर्ष २०२८-२९ पर्यंत ५०० ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनविण्याच्या दृष्टीने योजनाबद्धरित्या कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
जगात व देशात तंत्रज्ञान व आधुनिकतेची संक्रमण अवस्था असून निर्मितीकेंद्रीत उद्योग व स्पीड ऑफ डेटाला महत्त्व प्राप्त झाले आहे. देशात व राज्यात ५जी नेटवर्क आले आहे व लवकरच ६ जी नेटवर्कही येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापराद्वारे विविध क्षेत्रात सकारात्मक बदल घडत आहेत. राज्यशासनानेही याचा स्वीकार करत आगेकूच केली आहे. राज्याच्या जीएसटी प्रणालीतही ‘एआय’चा उपयोग होत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे. नुकतेच ‘नागपूर-वर्धा नॅशनल लॉजिस्टीक हब’ उभारण्यासंदर्भात राज्य शासनाने मोठा निर्णय घेतल्याचे सांगत यामुळे विदर्भ व राज्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.
०००