जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त चंद्रपूर शहरात प्रथमच भव्य रॅली व प्रबोधन कार्यक्रम

चंद्रपूर, दि. १० : प्रकल्प कार्यालय चंद्रपूर व आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त चंद्रपूर शहरात भव्य रॅली तसचे प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रकल्प कार्यालयअंतर्गत येणाऱ्या 13 शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरवात वीर बाबुराव शेडमाके स्मारक, चंद्रपूर येथून झाली. यावेळी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सुधाकर अडबाले, आमदार  किशोर जोरगेवार, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तथा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, प्रकल्पाअंतर्गत येणारे सहभागी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरवात केली. उपस्थित रॅलीला संबोधित करतांना त्यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व शासनामार्फत आदिवासी समाजासाठी विधिध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, याची माहिती दिली. अशा प्रकारच्या रॅलीचे आयोजन केल्यामुळे चंद्रपूर प्रकल्प कार्यालयाचे कौतुक केले.

यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, प्रकल्प कार्यालय व आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहरात अशा प्रकारचे प्रथमच विविध कार्यक्रम व भव्य रॅली तसचे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ज्या ज्या सामाजिक संघटना, चंद्रपूर प्रकल्पातील शाळा वसतिगृह, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला व हा संपुर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सहकार्य केले त्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

सदर रॅलीमध्ये जवळपास 30 ट्रॅक्टरवर आदिवासी संस्कृतीवर आधारीत झॉकी तयार करण्यात आल्या होत्या. सदर रॅली वीर शहिद बिरसा मुंडा स्मारक जेल रोड, चंद्रपूर येथून सुरु होऊन गांधी चौक मार्गे येऊन प्रियदर्शनी सभागृह येथे रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर आदिवासी नृत्य, पथनाट्य, विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, सादर करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन श्री. वड्डेट्टीवार यांनी तर आभार विस्तार अधिकारी श्रीमती कुत्तरमारे यांनी मानले.

 

संपूर्ण कार्यक्रम प्रकल्प अधिकारी श्री. विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनात पार पाडण्यात आला. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी डी. के. टिंगुसले,  जी. एम. पोळ, आर एस. बोंगीरवार, आर. टी. धोटकर, श्री. जगताप, श्री पाटील, वाय. आर. चव्हाण, एम, डी. गीरडकर, पी. पी. कुळसंगे, एस. डी. श्रीरामे, पी. बी. कुत्तरमारे, आदिवासी विकास निरीक्षक अमोल नवलकर, अमोल शिंदे, श्री. कुंटेवार व प्रकल्प कार्यालयातील सर्व कर्मचारी, आदिवासी सामाजिक संघटना, सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते.

या विषयांवर होत्या झॉकी: आदिवासी समाजासाठी शासनाच्या विविध योजना, प्रकल्प कार्यालयाने राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, आदिवासी संस्कृती, मिशन शिखरमुळे शिक्षणामध्ये झालेला बदल, जल, जंगल, जमीन याबाबत बिरसा मुंडा यांचे कार्य, महाराष्ट्रातील विविध आदिवासी भाषा, जमाती, वेशभुषा, वारली पेंटीग, जंगलातील जीवन इत्यादी.

०००