शेतकऱ्यांचे पीक विमाबाबत प्रश्न निकाली निघाल्याचे समाधान – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

  • ३१ ऑगस्टपर्यंत मिळणार शेतकऱ्यांना रक्कम

  • शेतकऱ्यांकडून पालकमंत्री मुनगंटीवार यांचे आभार

चंद्रपूर, दि. ११ : राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन केवळ पाच दिवसांत चंद्रपूर येथे दोन बैठका तर मुंबई येथे कृषिमंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला असून जिल्ह्यात प्रथमच पीक विम्याची 202 कोटी 76 लाखांची रक्कम 31 ऑगस्टपर्यंत मिळणार असल्याचे समाधान आहे, अशा भावना राज्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

नियोजन भवन येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा कृषी अधिक्षक शंकर तोटावार, उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, चंदनसिंग चंदेल, नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, बंडू गौरकर आदी उपस्थित होते.

पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन 5 ऑगस्ट रोजी चंद्रपूरात, लगेच 7 ऑगस्ट रोजी मुंबई येथे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि (शनिवारी )10 ऑगस्ट रोजी पुन्हा चंद्रपूर येथे पीक विमा योजनेचा आढावा घेण्यात आला, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे पीक विमा योजनेचा प्रश्न सुटलेला आहे.

पुढे पालकमंत्री म्हणाले, नो रेनफॉल या अटीअंतर्गत 20095 शेतकऱ्यांचे अर्ज होते. हे सर्व अर्ज आता मान्य करण्याचे विमा कंपनीने म्हटले आहे. तसेच पेरील नॉट कव्हर्ड या अंतर्गत असलेले 6864 अर्ज, लेट इंटिमेशन (सुचना वेळेवर न देणे) अंतर्गतचे 7959 अर्ज, क्लेम स्क्रुटीनी अंतर्गत 4811 अर्ज व इतर त्रृटी असलेले असे साधारणत: 37 हजारांच्या वर अर्ज आता मान्य करण्याचे विमा कंपनीने कबूल केले आहे. याशिवाय 4668 डुप्लीकेट अर्जांची पुन्हा पडताळणी करून स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये मान्य करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. क्रॉप मिसमॅचचे 1762 अर्जांची कृषी विभाग आणि विमा कंपनी पुन्हा नव्याने पडताळणी करणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. सादरीकरण जिल्हा कृषी अधिक्षक शंकर तोटावार यांनी केले.

प्रशासनाची ही तत्परता

प्रधानमंत्री पीक विमा योजना या संवेदनशील विषयावर जिल्हाधिकारी विनय गौडा, तसेच संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाची अतिशय तत्परता जाणवली. जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा करून संबंधित विभागाचा आढावा घेतला आणि सुचना केल्या. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगले काम केल्याबद्दल पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

जिल्ह्यात प्रथमच पीक विम्यासाठी ऐवढी मोठी रक्कम

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे एकूण 202 कोटी 76 लाख 23 हजार 944 रुपयांचे क्लेम आहेत. यात 1 लाख 51 हजार 352 शेतकऱ्यांचा समावेश असून यापैकी 86,657 शेतकऱ्यांना 80 कोटी 66 लाख 34 हजार 910 रुपयांचे विमा रक्कम मिळाली आहे. कंपनीकडून उर्वरीत 63 कोटी रुपये रक्षाबंधनाच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. शासनाच्या वतीने उर्वरित 59 कोटीची रक्कम लवकरच देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विम्याचे 3 लक्ष 46 हजार अर्ज

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यापूर्वी केवळ 62 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. मात्र गतवर्षी 1 लक्ष 84 260 शेतकऱ्यांचे 3 लक्ष 41 हजार 233 अर्ज आले. तर यावर्षी आतापर्यंत 1 लक्ष 79 हजार 443 शेतकऱ्यांचे 3 लक्ष 46 हजार 692 अर्ज आले आहेत.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे उर्वरित 46,500 हजार शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीकविम्याचा क्लेम मिळाला नाही . अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना त्यांच्या लाभ होणार आहे. उर्वरित 46500 हजार शेतकऱ्यांना आवश्यक बाबींची पूर्तता करून लवकरच साधारण 56 कोटी रुपये मिळणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामूळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दरवर्षी पेक्षा सर्वाधिक पीक विमा रक्कम या वर्षी मिळणार आहे. हे विशेष.

शेतकऱ्यांनी मानले पालकमंत्री यांचे आभार

सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व विशेष प्रयत्नाने ही पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

000000