मुंबई, दि.१४ : राज्य विविध क्षेत्रात अग्रेसर असून विविध कल्याणकारी योजनांद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे लोकशाही या वृत्तवाहिनीच्या संवाद २०२४ या कार्यक्रमात मुलाखतीत दरम्यान ते बोलत होते. लोकशाही वृत्त वाहिनीचे गणेश नायडू यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांनमध्ये सुटसुटीतपणा आणून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी प्रक्रिया सुकर करण्यात आली आहे. राज्यातील पात्र महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्या महिलांना लाभ मिळणार आहे. उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल त्यांना उत्पन्नचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे. लवकरच दोन महिन्याचे पैसे बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – २०२४” शासनाने लागू केली आहे. त्यामुळे आता ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या सर्व योजनांची सविस्तर माहिती यावेळी त्यांनी सांगितली. माध्यमांनी शासनाच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी जेणेकरून जनतेला त्याचा लाभ घेता येईल.
गणेशोत्सव पर्यावरण पुरक पद्धतीने व शांततेत साजरा करावे. ग्लोबल वार्मिंगचा धोका निर्माण होवू नये म्हणून सर्वांनी वृक्षारोपण करावे. बांबू लागवडीसाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज्यात मोठे उद्योग येत आहेत. त्यांच्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहेत. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. आरक्षणाबाबत शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
00000000
राजू धोत्रे/विसंअ