जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री अतुल सावे

0
17

स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जालना, दि. १५ (जिमाका):  जालना जिल्हा विविध क्षेत्रात प्रगती करीत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही गृहनिर्माण व इतर मागास बहुजण कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यास खासदार कल्याण काळे, आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायळ  तसेच स्वातंत्र्य सैनिक, प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, नागरिक आदी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पोलीस वाद्यवृंदाच्या सुरावटीवर राष्ट्रगीत व त्यानंतर राज्यगीत सादर झाले.  त्यानंतर पालकमंत्र्यांनी शुभेच्छा संदेश दिला. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना, हुतात्म्यांना आणि आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांना अभिवादन केले.

पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, जनतेच्या हितासाठी राज्य शासन अनेक लोकोपयोगी योजना प्रभावीपणे राबवित आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी शासनाने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी शासनाने यावर्षीपासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषिविषयक, सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100 टक्के सवलत दिली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत राज्यातील 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज पुरवली जाणार आहे. त्यासाठी 14 हजार 761 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’  सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे  उमेदवारांना शासकीय, निमशासकीय, महामंडळे, खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग या ठिकाणी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा. सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा पुरेशी माहिती नसल्याने तीर्थ यात्रा करण्याचे राहून जाते. ही बाब लक्षात घेऊन  राज्यातील 60 वर्ष व त्यावरील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील मोठ्या तीर्थ स्थळांचे दर्शन घेता येणार आहे. तसेच वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी शासनाकडून ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. वयोमानामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तसेच आवश्यक साधने खरेदी करण्याकरिता ज्येष्ठ नागरिकांना मदत व्हावी हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमार्फत शासनाकडून ३ हजार  रुपये ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणार आहेत. राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील उज्वला योजनेचे लाभार्थी तसेच मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या सर्व योजनांचा जनतेने आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी  केले.

पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, महसूल विभागाच्यावतीने महसूल पंधरवाड्याचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले आहे. या काळात जिल्ह्यात अनेक लोकोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन या सर्व योजनांची जनजागृती तसेच स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, सैनिक हो तुमच्यासाठी, एक हात मदतीचा-दिव्यांग कल्याणाचा, महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संवाद असे उपक्रम आणि महसूल विभागाशी संबंधित लोकाभिमुख घटक गाव पातळीपर्यंत प्रभावीपणे राबविण्याकरीता तालुकास्तरावर विशेष मोहिम राबविण्यात आली. याशिवाय जिल्हा प्रशासनाने महसुली वर्षात 4 लाख 16 हजार विविध प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. यात वय, अधिवास, शेती प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी, उत्पन्न, नॉन क्रिमिलेअरसह इतर प्रमाणपत्रांचा समावेश आहे. आनंदाची बाब म्हणजे प्रशासनाने जिल्ह्यात 122  तलाठी आणि 71 कोतवाल पदांची पदभरतीही केली आहे.

सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरु केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने यशवंतराव चव्हाण वैयक्तिक घरकुल योजना सुरु करुन या योजनेतंर्गत जिल्हयातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या सुमारे 7 हजार 286 लाभार्थींसाठी घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैयक्तिक घरकुल योजनेतंर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या सुमारे 6 हजार 943 लाभार्थींसाठी घरकुल मंजूर करण्यात आले आहेत.  तर रमाई आवास योजनेतंर्गत ग्रामीण क्षेत्रासाठी  6 हजार 842 तर शहरी क्षेत्रासाठी 541 घरकुलांच्या उद्दिष्ट मंजुरीसाठी शासनास शिफारस करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या जिल्ह्यात नवीन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी व स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हा गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून सुमारे 39 उद्योगांसमवेत तब्बल एक हजार 316 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असे सांगून  ते म्हणाले की, उद्योग विभागातंर्गत ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने’च्या माध्यमातून मागील वर्षी 358 नवीन उद्योग उभे राहिले असून याद्वारे अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे. पी. एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात नोंदणी करण्यात आलेल्या कारागिरांपैकी 3 हजार 589 कारागिरांना मान्यता देण्यात आली आहे. तर 1 हजार 284 जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पालकमंत्री श्री. सावे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य जनतेने सण उत्साहात साजरे करावेत यासाठी ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येतो. यावेळी देखील गौरी गणपती सणानिमित्त आपल्या जिल्ह्यातील तीन लाख 73 हजार लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रातून या वर्षी जुलै अखेरपर्यंत गरीब व गरजू व्यक्तींना 10 लाख 56 हजार एवढया थाळींचे वितरण करण्यात आले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे चार हजार 481 लाभार्थ्यांना बँक कर्ज मंजूर झाले आहे. सुमारे 518 कोटी रुपये इतके कर्ज वितरीत करण्यात आले असून महामंडळाकडून आजपर्यंत रुपये 37 कोटी इतका व्याज परतावा लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सुविधा अधिक चांगल्या व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यावर सातत्याने भर देण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी  जिल्हा नियोजन समितीमधून 48 चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. तसेच निर्भया पथकास महिलांच्या सुरक्षेच्या हेतूने 10 स्कुटर तर 5 मोटरसायकल खरेदी करण्यात आल्या आहेत. क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल अद्यावतपणे विकसीत करण्यात येत आहे.   जिल्हा क्रीडा संकुलात सध्या सुरु असलेली कामे पूर्णत्वाकडे आहे.  लवकरच या कामांचा लोकार्पण सोहळा करण्यात येऊन सर्व क्रीडा सुविधा खेळाडुंना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

जालना जिल्ह्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत पावसाच प्रमाण चांगले आहे, असे सांगून ते म्हणाले की, चालू खरीप हंगामामध्ये 100 टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.  पिकांची स्थितीही उत्तम आहे. पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी शासन व प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना अंतर्गत नळ योजना दुरुस्तीच्या मंजूर करण्यात आलेल्या 102 उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. तसेच तात्पुरती पुरक नळ योजनेच्या मंजूर करण्यात आलेल्या 16 पैकी 15 उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांकडून फक्त एक रुपया विमा हप्ता भरुन विमा काढला जातो. या योजने अंतर्गत चालू खरीप हंगामात 9 लक्ष शेतकऱ्यांनी 5 लक्ष हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. मागील वर्षी पिक विमा अंतर्गत 5 लाख 88 हजार  शेतकऱ्यांना 247 कोटी रक्कम वितरीत करण्यात आली होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणारी शेती म्हणून रेशीम शेतीकडे पाहिल्या जाते. जालना जिल्हयात सद्यस्थितीत एक हजार शेतकऱ्यांनी सुमारे एक हजार 88 एकर क्षेत्रामध्ये तुतीची लागवड केली आहे. चालू वर्षात जिल्ह्यात 56 हजार अंडीपुंजांचे वाटप करण्यात आले असून 33 मेट्रीक टन रेशीम कोषांचे उत्पादन झाले आहे. जालना येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲटोमॅटीक रिलींग मशीनची उभारणी करण्यात आली असून याद्वारे जागतिक स्तरावरील उत्कृष्ट दर्जाच्या रेशमाची निर्मिती जिल्ह्यात करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे रेशीम अंडीपुंज ते रेशीम धागा निर्मितीपर्यंतची प्रक्रिया असलेला आपला जालना हा राज्यात एकमेव जिल्हा ठरला आहे.

याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध व्यक्तींना व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, शहीदाच्या वीरपत्नी, आई-वडिलांचा सन्मान, उत्कृष्ट कार्याबद्दल पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

०००

पालकमंत्री अतुल सावे यांनी केली  जिल्हा क्रीडा संकुलातील कामांची पाहणी

जालना, दि. १५ (जिमाका) : राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलातील लॉन टेनिस मैदानासह इतर कामांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा क्रीडा संकुलावर करण्यात येणाऱ्या मैदानाची कामे गुणवत्तापूर्ण तसेच लवकरात लवकर पूर्ण करावेत, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पालकमंत्री श्री. सावे यांना कामांच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता स्मिता पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

०००

पोलिस मुख्यालयातील कामांचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लोकार्पण

जालना, दि. १५ (जिमाका) : जालना पोलिस मुख्यालयाच्या आतील व कवायत  मैदान नुतनीकरण तसेच विद्युत पथदिवे या कामाचे लोकार्पण राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज पोलिस कवायत मैदानावर पार पडले.

यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

०००

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here