जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २ लाख ७७ हजार ३२३ अर्ज मंजूर  -पालकमंत्री रवींद्र चव्हाण

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ
  • राज्य शासन सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणार

पालघर दि. १७ (जिमाका): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये राज्य शासन लोकोपयोगी योजना गरजू लाभार्थींपर्यंत पोहचवत असून राज्य शासन सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा नियोजन सभागृह पालघर येथे करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते (दुरदृष्य प्रणालीद्वारे) करण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ. हेमंत सावरा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैदही वाढाण, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण भावसार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मल्लिनाथ कांबळे तसेच लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

केंद्र व राज्य शासनाने जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असून किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपयांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले असे जवळपास 17 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले असल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 लाख 96 हजार 207 अर्ज प्राप्त झाले असून 2 लाख 77 हजार 323 अर्ज मंजूर झाले आहेत. आतापर्यंत जवळपास 2 लाख 8 हजार महिलांच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये जमा झाले आहेत. उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये येत्या दोन दिवसात पैसे जमा होतील. या योजनेमुळे जिल्ह्यातील भगीनींमध्ये आत्मविश्वास वाढला असून या रक्कमेतून त्यांना आपल्या आर्थिक अडचणी सोडविण्यास मदत मिळणार आहे. प्रत्येकांच्या हाताला काम देण्याच्या धोरणानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यामधील युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. नागरिकांसाठी मुख्यमंत्री तिर्थक्षेत्र दर्शन योजनेअंतर्गत नागरिकांना आपल्या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी शासन मदत करणार आहे.

ज्या भगिनीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यांनी काळजी करू नये, एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही असे नियोजन राज्य शासनाने केले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये उर्वरित भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. अशा महिलांना प्रतिनिधी स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

०००