दिलेला शब्द पाळणारे शासन- पालकमंत्री अब्दुल सत्तार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

हजारो बहिणींनी अनुभवला राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा

छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका):  पुणे येथे बालेवाडी क्रीडा संकुलात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, या योजनेचा राजस्तरीय वचनपूर्ती शुभारंभ सोहळा पार पडला. येथील वंदेमातरम सभागृहात या सोहळ्याचे थेट प्रसारण पाहण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. त्यामाध्यमातून जिल्ह्यातील हजारो बहिणी  या सोहळ्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार झाल्या. राज्यशासन हे दिलेला शब्द पाळणारे शासन आहे, तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला नक्की मिळणार, अशा शब्दात अल्पसंख्याक विकास, औकाफ व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित  बहिणींशी संवाद साधला.

येथील वंदेमातरम सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, महापालिकेचे अपर आयुक्त रणजीत पाटील, महिला बालकल्याण विभागाच्या उपायुक्त हर्षा देशमुख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

या सोहळ्यात बालविवाह प्रतिबंध अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने पात्र महिलांपर्यंत हा लाभ पोहोचविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ९९ हजार महिलांना लाभ मिळाला असून उर्वरित पात्र महिलांनाही लवकरच लाभ देण्यात येईल. राज्यशासनाने लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे ही योजना बंद पडेल या अपप्रचाराला बळी पडू नये. महिला सक्षमीकरणाचा हा निधी असून तो महिलांच्या हक्काचा निधी आहे. या योजनेचा लाभ हा महिलांचा सन्मान म्हणून दिला जातोय. आजचा दिवस हा आनंदाचा दिवस असून वचनपूर्तीचे समाधान आहे.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेमुळे लाभ होणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यात येईल. सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले.

प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले. त्यात त्यांनी लाभार्थी नोंदणीसाठी अंगणवाडी पातळी ते सुपरवायझर यांनी केलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सूत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले. या कार्यक्रमात वंदेमातरम सभागृहात जिल्हाभरातून आलेल्या बहिणींची उपस्थिती होती.

०००