नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना; शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
लातूर, दि. १८ : जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी, गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे, तालुका कृषि अधिकारी आकाश पवार यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते.
केकत शिंदगी, होकर्णा, वडगाव येथील पीक नुकसानीची पाहणी केल्यानंतर ना. बनसोडे यांनी वडगाव येथील हनुमान मंदिरात शेतकरी, नागरिकांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. पावसामुळे पिकांचे, रस्त्यांचे नुकसान झाल्याची माहिती यावेळी शेतकऱ्यांनी दिली. तसेच सुमारे आठ ते नऊ गावांमध्ये साडेतीन ते चार हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, मूग आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे तालुका कृषि अधिकारी श्री. पवार यांनी सांगितले.
नुकसानीची माहिती मिळताच दूरध्वनीद्वारे प्रशासनाला पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. आज प्रत्यक्ष पाहणी करताना शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी नुकसान पंचनाम्याचा अहवाल त्वरीत शासनाला सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.