‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेसाठी युवकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

0
14

मुंबई, दि.२१ : सर्वाधिक रोजगार देणारे शहर मुंबई असून योग्य प्रशिक्षित मनुष्यबळ  उपलब्ध झाल्यास जास्तीत-जास्त रोजगार निर्माण होतील. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र महाविद्यालयात सुरू करण्यासाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व  महाविद्यालयांनी मागणी नोंदवावी. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी जास्तीत-जास्त रोजगाराची मागणी नोंदवावी, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणी संदर्भात मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात आयोजित बैठकीच्या उद्घाटन  प्रसंगी कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा बोलत होते.  मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, मुंबई उपनगरचे जिल्हा कौशल्य विकास अधिकारी रवींद्र सुरवसे, मुंबई शहरचे जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संदीप गायकवाड यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, शिक्षणासोबत योग्य कौशल्य प्रशिक्षण दिल्यास अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. उद्योग जगताला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शासन, उद्योजक व अशासकीय सर्व संस्था यांच्या मदतीने आपण कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाने रोजगार निर्मितीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वाढीस लागावे यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकासकेंद्र देखील सुरू केलेले आहेत. राज्यात एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून यामध्ये प्रत्येक महाविद्यालयात  एक कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या केंद्रांसाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मधून शंभर टक्के केंद्रांची मागणी नोंदवावी. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी जास्तीत-जास्त रोजगाराची मागणी नोंदवावी. उद्योजकांनी तसेच खाजगी आस्थापनांनी आपली रोजगाराची मागणी नोंदवावी, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर म्हणाले की, भारत हा सर्वाधिक युवांची संख्या अधिक असलेला देश आहे. भारताची लोकसंख्या हेच सध्या बलस्थान आहे. प्रत्येक युवक युवतीला काळानुरूप कौशल्य विकास करून जास्तीत-जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होतील, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. प्रत्येक महाविद्यालयाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून पदवी सोबतच काळानुरूप कौशल्य युवांना शिकवावेत. कौशल्य विकास विभागाच्या दोन्ही योजना पूरक असून या दोन्ही योजनेमध्ये प्रत्येक महाविद्यालयाने तसेच उद्योजकांनी, विविध आस्थापनांनी आपली मागणी नोंदवावी, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी कौशल्य अभियान अधिकारी विनय काटोलकर यांनी सूत्रसंचालन केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

०००००

संध्या गरवारे/वि.सं.अ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here