लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
12

नाशिक येथे महिला सक्षमीकरण महाशिबिरात विविध शासकीय योजनांचे लाभ वितरण

  महाशिबिराला हजारोंच्या उपस्थितीसह महिलांचा उदंड प्रतिसाद

नाशिक, दि. २३ : महिला म्हणजे आदिशक्तीच आहेत. त्यांच्यासाठी काही करता आले, हे आमचे सर्वांचे भाग्य आहे. ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेद्वारे दिलेला शब्द राज्य शासनाने पाळला. भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले. लाडक्या बहिणींना हक्काचा आर्थिक आधार देण्याबरोबरच बदलापूर येथील अनुचित घटनेच्या पार्श्वभूमीवर शासन‌ महिलांच्या सुरक्षेप्रतीही संवेदनशील आहे. लाडकी बहीणप्रमाणेच सुरक्षित बहीणसाठीही शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

तपोवन मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान महाशिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या महाशिबिराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार सर्वश्री किशोर दराडे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल आहेर, नितीन पवार, राहुल ढिकले, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे राखी पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर बहिणींच्या खात्यात जमा झाले. नाशिक जिल्ह्यातील ११ लाख अर्जांपैकी ८ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. उर्वरित ३ लाख महिलांच्या खात्यात पुढील आठवड्यात पैसे जमा होतील. राज्यात १ कोटी ४० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्यांचे पैसे देण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ दिली जाणार नाही. याउलट लाडकी बहीण योजनेच्या लाभात वेळोवेळी वाढ केली जाईल, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शासनाने कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. राज्याचा विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्यात येत आहे, असे सांगून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे काम कोणीही करू नये. राज्याची पुरोगामी संस्कृती आपल्याला पुढे न्यायची आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

लाडकी बहीण योजनेतून महिलांचा सन्मान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत बनविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करणाऱ्या महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणासाठी लेक लाडकी, ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ अशा योजना आणल्या आहेत. एसटी बस मध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिल्याने तोट्यातील एसटी फायद्यात आली. मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात आले. लाडकी बहीण योजनेतून देण्यात येणारी ही केवळ रक्कम नाही, तर त्यामुळे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. महिलांविषयी कुटुंबात आदर वाढत आहे.

आदिवासी बांधवांसाठी पेसा भरतीचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेऊन याबाबत कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही देऊन उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल. महिला सुरक्षेसाठी समाजानेही जागृत राहिले पाहिजे. घरातील मुलांनी स्त्रियांचा सन्मान करण्याचे संस्कार देण्याची जबाबदारी प्रत्येक कुटुंबाची आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

प्रास्ताविकात पालकमंत्री श्री.भुसे म्हणाले, नाशिक जिल्ह्यात महिलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आले. महिला बचत गटांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून योजना राबविण्यात येत आहेत. एका वर्षात आठशे अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घेण्यात आले. राज्यातील मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी वर्ग करण्यात नाशिक जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे त्यांनी सांगितले.

अन्न व नागरी व पुरवठा मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, शासनाने समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी योजना‌ राबविण्याचा निर्णय घेतला. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लखपती दीदी योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा विविध योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलेली मुलींची पहिली शाळा शासन बांधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लाभांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण

या सोहळ्यात विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्राचे व लाभांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले. यात स्वाती संदीप फसाळे, मनीषा योगेश निफाडे, कमला आनंदा सरनाईक, अनिता किसन जाधव, रश्मी अविनाश पगारे (मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना), तसनिम फातेमा सोहेल अहमद, निकिता अक्षय कोल्हे (लेक लाडकी योजना), पंकज दिलीप गाडे, अक्षदा अनिल दबडे (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना), इच्छामणी महिला बचतगटातील संगिता कैलास मुसळे, राजश्री चंद्रकांत भागडे (महिला बचत गटांना व्यवसायासाठी बँक कर्ज वितरण), जगदंबा स्वयंसहायता समूह उषा संतोष आभाळे (उमेद अभियानांतर्गत बँक कर्ज वितरण), महालक्ष्मी स्वयंसहाय्यता समूह मनीषा संजय गोडसे (उमेद अभियानांतर्गत लखपती दीदी प्रमाणपत्र), स्वामी समर्थ स्वयंसहाय्यता समूह भारती सुखदेव जाधव (उमेद अभियानांतर्गत फिरता निधी), मंजुळाबाई काशिनाथ फोडसे (राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना), धनश्री शंकर गायकवाड (राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण), नवसाबाई लक्ष्मण चौधरी (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना) या लाभार्थींना लाभवाटप करण्यात आले. महिलांनी शासकीय योजनांच्या लाभामुळे जीवनमानात झालेल्या बदलाविषयी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमापूर्वी मुख्य सभामंडपाकडे जातांना मैदानाच्या चौफेर उपस्थ‍ित असलेल्या लाडक्या बह‍ीणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे राख्या देऊन स्वागत केले. महिलांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात मान्यवरांचे स्वागत केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कन्यापूजनाने महाशिबिराचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तृणधान्य पदार्थांचा संच देऊन स्वागत करण्यात आले.

महाशिबिर कार्यक्रमापूर्वी, नाशिक जिल्ह्यातून शिबिरासाठी येणाऱ्या लाडक्या बहिणींचे पालकमंत्री श्री. भुसे यांनी स्वागत केले. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची रूपरेषा डॉ. अमोल शिंदे यांनी सादर केली. सूत्रसंचालन‌ सीमा पेठकर यांनी केले. आभार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मानले.

 महाशिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह विविध यंत्रणांनी मेहनत घेतली.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here