हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद जयंती : ‘२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन’

जागतिक पातळीवर हॉकी या खेळात भारताला सर्वोच्च स्थान मिळवून देणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचा जयंती दिवस हा केंद्र सरकारतर्फे ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून देशभरात साजरा केला जातो. जागतिक कीर्तीचे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म दि. 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद येथे राजपूत घराण्यात झाला अन् जणू भारतमातेच्या उदरातून हॉकीचा सिताराच उदयास आला. त्याच्या थोर कीर्तीला तमाम भारतीयांच्या वतीने मानवंदना !

ख्यातनाम हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे वडील सामेश्वर दत्तसिंह हे देखील नामवंत हॉकीपटू होते, तर ध्यानचंद यांचा लहान भाऊ रूपसिंह हाही हॉकीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू होता. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सामेश्वर दत्त यांच्या परिवाराने भारतीय हॉकीसाठी आपले सारे जीवनच समर्पित केले. अशा महान परिवाराला आम्ही भारतीय वंदन करतो.

मेजर ध्यानचंद यांच्या जीवनाविषयी बोलायचं झालं तर, वयाच्या 18 व्या वर्षी ते आर्मीमध्ये दाखल झाले. मुळात ध्यानचंद यांचे खरं नाव ध्यान हे होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ध्यानचंद हे रोज रात्री चंद्रमाचे आकाशात आगमन होताच हॉकीच्या सरावाची सुरुवात करायचे. या पार्श्वभूमीवर त्याचे सहकारी खेळाडू त्याला विनोदात ध्यान ‘चंद’ या नावाने बोलवत असत. बघता बघता ते साऱ्या जगतात ध्यानचंद या नावानेच ओळखले जाऊ लागले.

भारताच्या पारतंत्र्यात अन् स्वातंत्र्याच्या कालखंडात देशाला साऱ्या विश्वात हॉकीमध्ये मोठे मानाचे स्थान मिळवून देणारे ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार म्हणून प्रख्यात झाले. मेजर ध्यानचंद यांनी 1928, 1932 व 1936 मध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये सूवर्णपदके मिळवून दिलीत. हा खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्रात केलेला विश्व विक्रमच म्हटला जातो. मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, स्वित्झलँड, नेदरलँड, जर्मनी, हंगेरी, बर्लिन, जपान, अमेरिका, न्यूझीलंड आदी देशांच्या हॉकी संघांना मोठ्या लिडने पराभूत केले. सन 1926 ते 1948 या कालखंडात मेजर ध्यानचंद यांनी आपल्या हॉकीच्या करियरमध्ये सुमारे 400 गोल केले. हा खऱ्या अर्थानं हॉकीमधील उच्चांक म्हणावा लागेल. यास्तव समस्त मराठी भूमीपुत्रांतर्फे मेजर ध्यानचंद यांना त्रिवार मानाचा मुजरा!

यंदाच्या पॅरिस ऑलंम्पिक 2024 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी येथील क्रीडापटू स्वप्निल कुसाळे याने पुरुषांच्या 50 मीटर नेमबाजीत भारताला कास्यपदक जिंकून दिले. याबद्दल पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे अन् मंत्रिमंडळातील सदस्यांनी स्वप्निलचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी स्वप्निल अन् अन्य विजयी खेळाडूंचे  अभिनंदन करताना, तुम्ही हे पदक मिळवून देशाचे नाव जगात कीर्तीमान केलं आहे, या शब्दात गौरव केला. तर मुख्यमंत्र्यांनी स्वप्निलचे तोंड भरून कौतुक करीत त्याला राज्य सरकारतर्फे 1 कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले. महत्वाचे म्हणजे स्वप्निलचे कोल्हापूर नगरीत जंगी स्वागत करण्यात आले. राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, खासदार छत्रपती शाहू महाराज, सतेज पाटील, अन्य सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी अन् जिल्हा प्रशासन, स्थानिक नागरिक यांनी विजयी मिरवणूक काढून त्याच्या नावाचा जयघोष केला. ढोलताशांच्या गजरात त्याचे राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत जंगी स्वागत करण्यात आले. त्यासह हेलिकॉप्टरने त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी कोल्हापूरात सर्वत्र हर्षोल्हासाचे वातावरण पसरले होते. इतकेच नव्हे तर, राज्यातून त्याच्यावर अक्षरशः अभिनंदनाचा वर्षाव झाला.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून राज्यातील शिंदे सरकारच्या महायुतीने हिंदुस्थानाला पहिले ऑलंम्पिक पदक जिंकून इतिहास घडविणारे मराठमोळे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या नावाने कराड तालुक्यातील गोळेश्वर या जन्मजावी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी 25 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या नियोजित क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी निधी मिळावा, यासाठी रुग्णदूत म्हणून राज्यात ओळख असलेले मंगेश चिवटे अन् आरोग्यदूत पहिलवान युवराज काकडे यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले होते. इतकेच नव्हे तर, त्यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदन देवून यासंदर्भात विनंतीही केली होती. त्यांच्या या अथक प्रयत्नांना आज यश लाभल्याने वैद्यकीय मदत कक्षाच्या राज्यातल्या रुग्णसेवकांना, क्रीडापटू व खाशाबांच्या चाहत्यांना अत्यानंद होऊन त्यांना सुखद दिलासा मिळाला आहे. या सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् मंत्रिमंडळातील सदस्यांचे शतश: आभार मानले आहे.

मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीमधील मोलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून केंद्र सरकारने दिल्ली येथील नॅशनल स्टेडियमला मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले. इतकेच नव्हे तर, भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ 2002 पासून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. सन 1956 मध्ये मेजर ध्यानचंद यांना महामहीम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले. मेवाडचे राजा महाराणा प्रतापसिंह यांचा आदर्श घेऊन मेजर ध्यानचंद यांनी जाज्वल्य राष्ट्रभक्ती आणि निस्सीम देशप्रेम उराशी बाळगून भारतीय हॉकीला विश्वात मानाचे स्थान मिळवून देण्यात आपले सारे आयुष्य पणाला लावले.

मेजर ध्यानचंद यांच्यासारख्या देशभक्त, नि:स्पृह व जाँबाज खेळाडूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विविध खेळांतल्या भारतीय खेळाडूंनी राष्ट्रप्रेमाची भावना ठेऊन खूप मेहनत करीत हिंदुस्थानचे नाव विश्वात अजरामर करावे, हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल.

0000

-रणवीरसिंह राजपूत, ठाणे/नंदुरबार,

निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी / पत्रकार