चला… सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होवू या..!

सार्वजनिक गणेशोत्सवात जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, यासाठी सन 2023 मध्ये राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि.31 जुलै 2024 या शासन निर्णयान्वये घेतला आहे.

या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी कार्यपध्दती पुढीलप्रमाणे:-

या शासन स्पर्धेत, धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड पुढील निकषांच्या आधारे करण्यात येईल.

1) सांस्कृतिक कार्यक्रम/स्पर्धांचे आयोजन (प्रत्येकी 2 गुण)-20

Ø गायन

Ø वादन

Ø नृत्य

Ø नाट्य

Ø लोककला

Ø आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कला

Ø हस्तकला

Ø चित्रकला

Ø शिल्पकला

Ø  माहितीपट/चित्रपट

Ø  संस्कृतीचे जतन/संवर्धन (प्रत्येकी 2 गुण) – 10

Ø  संस्कृती संवर्धनासाठी अभिनव उपक्रम

Ø  पारंपारिक नाणी/शस्त्र/भांडी इ.संग्रहांचे प्रदर्शन

Ø  साहित्य विषयक उपक्रम

Ø  लुप्त होणाऱ्या कलाविष्कारांचे संवर्धन

Ø  राज्यातील गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन- 5 गुण

Ø  राष्ट्रीय/राज्य स्मारके, धार्मिक स्थळांविषयी जनजागरुकता, जतन व संवर्धन- 5 गुण

Ø  सामाजिक उपक्रम (प्रत्येकी 2 गुण)

Ø  महिला सक्षमीकरण

Ø  पर्यावरण रक्षण

Ø  वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार

Ø  व्यसनमूक्ती/अंधश्रध्दा निर्मूलन/सामाजिक सलोखा

Ø  जेष्ठ नागरीकांसाठी उपक्रम

Ø  आरोग्यविषयक उपक्रम

Ø  शैक्षणिक उपक्रम

Ø  कृषीविषयक उपक्रम

Ø  आधुनिक तंत्रज्ञानाची जनजागृती

Ø  वंचित घटकांसाठी उपक्रम

2) कायमस्वरुपी सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना 5 गुण देण्यात यावेत.

उदा. सार्वजनिक गणेश मंडळांकडून कायमस्वरुपी राबविण्यात येत असलेल्या आरोग्य सेवा, ग्रंथालय, वृध्दाश्रम, एखादे गाव दत्तक घेणे व इतर सामाजिक सेवा

Ø पर्यावरणपूरक मूर्ती, गुणांक-10.

Ø पर्यावरणपूरक सजावट (थर्माकोल/प्लॅास्टिक विरहित), गुणांक-5.

Ø ध्वनीप्रदूषण रहित वातावरण, गुणांक-5.

Ø पारंपारिक / देशी खेळांच्या स्पर्धा- गुणांक-10.

Ø गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविणा गुणांक-20.

Ø पिण्याच्या पाण्याची सोय

Ø प्रसाधनगृह

Ø वैद्यकीय प्रथमोपचार

Ø वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन/आयोजनातील शिस्त

Ø परिसरातील स्वच्छता

(या स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या कार्याबाबतचा कालावधी हा सन 2023 च्या अनंत चतुदर्शी ते सन 2024 च्या गणेश चतुदर्शी पर्यंतचा असेल.)

या गणेशोत्सव स्पर्धेंतर्गत भाग घेणाऱ्या मंडळापैकी मागील सलग 2 वर्षे राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. ही अट इतर मंडळांना संधी देण्याच्या उद्देशाने नमूद करण्यात आली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर दि.31 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज करावा.

 

विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती:-

(1) जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी- अध्यक्ष

(2) शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक – सदस्य

(3) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी- सदस्य

(4) जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी- सदस्य

(5) जिल्ह्यातील पोलीस अधिकारी- सदस्य

(6) जिल्हा नियोजन अधिकारी- सदस्य सचिव

संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी हे वरील अधिकाऱ्यांची नियुक्ती व त्यांचे समन्वय करतील. ही निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हिडिओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. ही समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्हयातून प्रत्येकी 3 व अन्य जिल्हयातून प्रत्येकी 1 सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे व सर्व कागदपत्रे व्हिडिओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत, प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई यांना त्यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर सादर करतील.

जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस केलेल्या याद्यांमधून 3 विजेते क्रमांक निवडण्यासाठी राज्यस्तरावरील निवड समिती:-

(1) सर जे.जे. कला विद्यालयाचे अधिष्ठाता / वरिष्ठ प्राध्यापक- अध्यक्ष

(2) पर्यावरण विभागातील वरिष्ठ गट -अ मधील अधिकारी- सदस्य

(3) राज्य जनसंपर्क अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना- सदस्य सचिव

वरील दोन्ही समितीसाठी प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी हे समन्वयक असतील.

राज्यस्तरीय समिती ही जिल्हास्तरीय समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्हयांतून प्रत्येकी 3 व अन्य जिल्हयातून प्रत्येकी 1 याप्रमाणे एकूण 44 प्राप्त शिफारशीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून गुणांकन व संबंधित कागदपत्राच्या आधारे पहिल्या 3 विजेत्यांची निवड करतील व त्यांचा अहवाल प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्याकडे सादर करतील.

राज्यातील पहिल्या 3 विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुढीलप्रमाणे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल.

प्रथम क्रमांक- रु.5,00,000/-, द्वितीय क्रमांक- रु.2,50,000/-,  तृतीय क्रमांक – रु.1,00,000/-

राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरीलप्रमाणे 3 विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये 25,000/- चे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000000000

-मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी (ठाणे)