मुंबई, दि. ३० : राज्यातील आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाकडून राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 (दुसरा)” कार्यक्रम दि.25.06.2024 ते दि.30.08.2024 या कालावधीत राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार आज दि.30.08.2024 रोजी राज्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये, तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
“विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 (दुसरा)” अतंर्गत दि.06.08.2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच प्रारुप याद्यांसाठी दि.06.08.2024 ते दि.30.08.2024 या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात आल्या. दि.06.08.2024 रोजी प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये एकूण मतदार 9 कोटी 36 लाख 75 हजार 934 होती. आता या उपक्रमानंतर प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम मतदार याद्यांनुसार राज्यात एकूण मतदार 9 कोटी 53 लाख 74 हजार 302 एवढे झालेले आहेत. प्रारुप मतदार यादीपेक्षा अंतिम मतदार यादीमध्ये 16 लाख 98 हजार 368 मतदारांची संख्या वाढलेली आहे.
प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने अंतिम मतदार यादीतील मतदारांमधील बदलाचा तपशिल पुढील तक्त्यात दर्शविल्यानुसार आहे:-
अ.क्र. | बाब | पुरुष मतदार | स्त्री मतदार | तृतीयपंथी | एकूण |
1. | दि.06.08.2024 रोजी प्रसिध्द झालेली प्रारुप मतदार यादी | 4,86,53,088 | 4,50,17,066 | 5,780 | 9,36,75,934 |
2. | स्वीकारलेले एकूण दावे | 8,80,656 | 11,97,240 | 185 | 20,78,081 |
3. | स्वीकारलेल्या एकूण हरकती | 1,99,748 | 1,79,944 | 21 | 3,79,713 |
4. | दि.30.08.2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी | 4,93,33,996 | 4,60,34,362 | 5,944 | 9,53,74,302 |
5. | प्रारुप मतदार यादीवर मतदारांमधील निव्वळ बदल | 6,80,908 | 10,17,296 | 164 | 16,98,368 |
या कार्यक्रमादरम्यान दि.10, 11 व 17, 18 ऑगस्ट, 2024 या तारखांना मतदार नोंदणीसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर युवक, महिला, दिव्यांग यांच्याकरिता विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे राज्यातील विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांच्या सहकार्याने राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे अंतिम मतदार यादीमध्ये नवीन युवक मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. प्रारुप मतदार यादीच्या तुलनेमध्ये अंतिम मतदार यादीमधील नवीन मतदारांमध्ये झालेली वाढ पुढीलप्रमाणे आहे. :-
वयोमर्यादा | दि.06.08.2024 रोजीची प्रारुप मतदार यादी. | दि.30.08.2024 रोजीची अंतीम मतदार यादी. | निव्वळ वाढ |
18 – 19 | 14,99,405 | 18,67,170 | 3,67,765 |
20 – 29 | 1,74,29,276 | 1,81,84,847 | 7,55,571 |
दि. 06.08.2024 रोजीच्या प्रारुप मतदार यादीमध्ये दिव्यांग मतदारांची संख्या 6,06,505 एवढी होती. आता दि.30.08.2024 रोजीच्या अंतीम मतदार यादीनुसार दिव्यांग मतदारांची नोंदणी 6,28,063 इतकी झालेली आहे. त्यानुसार अंतीम मतदार यादीमध्ये दिव्यांग मतदारामध्ये 21,558 इतक्या संख्येने वाढ झालेली आहे.
महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर 925 वरून 933 इतके वाढलेले आहे. या कार्यक्रमांतर्गत दावे व हरकतीच्या कालावधीमध्ये नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांना, नोदींमध्ये दुरुस्ती केलेल्या मतदारांना मतदान छायाचित्र ओळखपत्र देण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. या कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी जरी प्रसिद्ध करण्यात आलेली असली, तरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 मध्ये नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधी 10 दिवसांपर्यंत नाव नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. अंतिम मतदार यादीमध्ये नागरिकांनी आपली नावे तपासून घ्यावीत व अद्ययावत करावीत. ज्यांची नावे यादीत नाहीत त्यांनी अर्ज सादर करून नाव नोंदणी करावी. मतदारांनी आपले नाव जुन्या मतदान केंद्रात नसेल, तर नजिकच्या मतदार केंद्रात असल्याची खात्री करून घ्यावी किंवा व्होटर हेल्प लाईन ॲपवर जाऊन मतदान केंद्राचा पर्याय निवडावा व आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
०००
वंदना थोरात/वि.स.अ.
[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/08/Age-Cohort_Final-Roll_30.08.2024_Revised.pdf” title=”Age Cohort_Final Roll_30.08.2024_Revised”]
[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/08/District-Wise_Gender-Wise_Elector-Count_Final-Roll_30.08.2024.pdf” title=”District Wise_Gender Wise_Elector Count_Final Roll_30.08.2024″]