गणेश उत्सवापूर्वी  मिरवणूक व विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवा – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
11

सातारा दि. 2 (जिमाका) : गणेशोत्सवाला येत्या 7 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. गणेशोत्सवापूर्वी नगर पालिका हद्दीतील मिरवणुक मार्गावरील व विसर्जन मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावेत तसेच रस्त्यांकडील नाले सफाईही करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सव-2024 पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे,  अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ध्वनी मर्यादेचे पालन होईल या दृष्टीने पोलीस विभागाने दक्ष रहावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शहरांमध्ये मोठे मोठे देखावे पाहण्यासाठी महिला, मुली मोठ्या संख्येने घरा बाहेर पडतात. त्यांची कोठेही छेडछाड होणार नाही  यासाठी साध्या वेशात पोलीसांनी गस्त वाढावावी. गणेशोत्सवापूर्वी टवाळखोरांवर कार्यवाही करावी. गणेशोत्सव कालावधीत पोलीस विभागासह इतर यंत्रणांनी अलर्ट मोडवर काम करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विद्युत प्रवाहाचा शॉक लागून अनुचित प्रकार घडणार नाही  यासाठी विद्युत वितरण कंपनीने दक्षता घ्यावी. त्याचबरोबर ज्या ठिकाणी विद्युत प्रवाहाच्या तारा खाली आल्या असतील तर त्या वर उचलाव्यात. जिल्ह्यातील धरणे 98 ते 99 टक्के भरली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणांमधून विसर्ग करण्यात येईल यामुळे नदीपात्रात  गणेश विसर्जनावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी गणेश विसर्जन सुरक्षीत होईल या दृष्टीने कार्यवाही करावी. त्याचबरोबर नगर पालिकांकडून गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्यात येत आहेत. या तलावांमध्ये गणेश मुर्ती पूर्णपणे विसर्जीत होतील याची दक्षता घ्यावी. यासाठी अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र नियुक्त्या कराव्यात, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here