राज्य कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

0
13

आदर्श शिक्षक, फेलोशिप प्राप्त विद्यार्थी व विविध संस्थांचा सत्कार

मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कौशल्य विकसीत केले जात आहे. रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देणे हे या विद्यापीठाचे यश आहे, असे मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामार्फत शिक्षकदिनानिमित्त गुरूवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा.डॉ.अपूर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास नाईक, अतिरिक्त आयुक्त अनिल सोनावणे, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन विजय कलंत्री, रजिस्टार राजेंद्र तलवारे, अमृत योजनेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू या आदर्श गुरू आहेत नुकत्याच झालेल्या जळगाव येथील कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉ.अपूर्वा पालकर यांच्या कार्याचा उल्लेख केला आहे. आजच्या काळात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. खासगी क्षेत्रांमध्ये विकसित कौशल्याची आवश्यकता असते. विद्यापीठ आणि खासगी संस्थामध्ये समन्वय उत्तमरीत्या साधला जात आहे. त्यामुळे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. कौशल्य विद्यापीठाचे काम उत्तमरीत्या होत आहे. जे विद्यार्थी कौशल्य विद्यापीठामधून शिकून पुढे जाणार आहेत. त्यांनी स्टार्ट अपसाठी पुढील संधीचा विचार आणि आखणी करायला लागा. काळानुरूप कौशल्य विकसित करा असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) तसेच मराठी विज्ञान परिषदेचे शास्त्रज्ञ डॉ.जे. बी. जोशी म्हणाले की, देशाचे उत्पादन वाढण्यामध्ये सेवा क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. जगात एकूण दीड कोटीहून अधिक उद्योग आहेत. आपल्या देशाला दहा कोटी नोकऱ्यांची आवश्यकता आहे. शेतीमध्ये कमी धारण क्षेत्रामध्ये अधिकाधिक उत्पन्न कसे घेता येईल यावर नावीन्यपूर्ण विचार केला तर शेतकऱ्यांना मदत होईल. आपल्यासमोर असणाऱ्या प्रश्नांवर नाविन्यपूर्ण उत्तर काढल्याने अनेक स्टार्टअप सुरू होतील तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नाविन्यपूर्ण दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रशिक्षण खूप महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

आदर्श शिक्षक, फेलोशिप प्राप्त विद्यार्थी व विविध संस्थाचा सत्कार

कौशल्य विद्यापीठ विविध संस्थांसोबत जोडले गेलेले असून विद्यापीठाने मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या संबंधित कौशल्य मित्रा, संचेती हेल्थकेअर अकॅडमी, झुडियो, मॅकडोनाल्ड, वर्ल्ड ट्रेड सेंटर यांच्या प्रतिनिधींचा या समारंभ सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या कौशल्य वृद्धीसाठी  कार्यरत असलेल्या अमर सक्सेना, आदिती काळे, भूपेंद्र कौर, सुनील जोशी, प्रतीक नार्वेकर व वसुधा जाधव शिक्षकांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. अमृत उद्योगिकता विकास योजनेअंतर्गत निवडक 15 स्टार्टअपला प्रति तीन लाख रुपये  विद्यावेतन पत्र यावेळी वितरित केले गेले. नरवाडे कट्यालिस्ट, कॅश फ्री मेट्रो, माय बोर्ड यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ यांनी सामंजस्य करार केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here