शासनाच्या लोकहिताच्या कल्याणकारी योजना माध्यमांनी नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
17
  • सकाळ माध्यम समूहाच्या सरकारनामा या राजकीय साप्ताहिकाचा शुभारंभ

मुंबई, दि. ६ : राज्य शासन हे लोकहिताचे निर्णय घेत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ प्रभावीपणे राबविली जात आहे. याबरोबरच शेतकरी, तरुण व ज्येष्ठांसाठीही योजना राबविण्यात येत आहेत. या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोचविण्याचे काम माध्यमांनी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सकाळ माध्यम समूहाच्या सरकारनामा या राजकीय साप्ताहिकाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज बीकेसीतील आयएनएस टॉवर येथील साम टीव्हीच्या कार्यालयात झाला. यावेळी सकाळचे मुख्य संपादक निलेश खरे, संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार,  मुंबई सकाळचे संपादक राहुल गडपाले, सुरेंद्र पाटसकर यांच्यासह विविध आवृत्यांचे संपादक उपस्थित आहेत. यावेळी साम टीव्हीच्या वतीने मुख्य संपादक श्री. खरे यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मुलाखत घेतली.

सकाळ माध्यम समूहाच्या नव्या सरकारनामा या साप्ताहिकाच्या शुभारंभास शुभेच्छा देऊन  मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य शासन अनेक लोकोपयोगी व कल्याणकारी योजना राबवित आहे. या योजना लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, त्यासाठी माध्यमांनीही सहकार्य करावे. तसेच बातम्या देताना माध्यमांनी दोन्ही बाजू जाणून घेऊन वस्तुनिष्ठ माहिती लोकांपुढे मांडावी.

गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने अनेक प्रकल्पाना चालना दिली तर अनेक नवीन प्रकल्प सुरू केले. वॉर रूमच्या माध्यमातून या प्रकल्पांवर सनियंत्रण ठेवले.

समृद्धी महामार्ग, अटल सेतू, सागरी किनारा मार्ग, मेट्रो अशा प्रकल्पामुळे वाहतूक जलद झाली असून वेळ व इंधन वाचण्यास मदत होत आहे. लवकरच मेट्रो -3 सुरू होणार असून यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार असून लाखो लोकांचा प्रवास सुखकर होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विकास प्रकल्पांना चालना देतानाच दुसरीकडे आम्ही अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लेक लाडकी व लखपती दिदी अशा योजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबाचा विचार करून या योजना सुरू केल्या आहेत. राज्यातील शेतकरी, महिला, तरुण व ज्येष्ठ अशा सर्व घटकांचा विचार हे शासन करत आहे. या सर्व योजनासाठी निधीची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या वर्षी 33 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या लाभाच्या रकमेत पुढील काळात वाढ करण्यात येईल. ही योजना बंद होणार नाही, असा विश्वास ही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here